मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आज सकाळी शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती के. सी वेणुगोपाळ यांनी दिली.
याबाबत ट्विट करुन के. सी वेणुगोपाळ यांनी सांगितले की, आज सकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात फोनवरुन संवाद झाला. या संवादानंतर शरद पवार यांच्या भेटीला अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आणि मी स्वत: पुढील चर्चा करण्यासाठी मुंबईला जात आहोत. लवकरात लवकर शरद पवारांशी आमची भेट होईल असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यात शिवसेनेलासोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार स्थापन करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार, विधिमंडळ नेते अजित पवारांसह अन्य महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणावर पुढील रणनीती ठरविली जाईल. या बैठकीनंतर ४ वाजता काँग्रेस नेते आणि राष्ट्रवादी नेते यांच्यात बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यातील या घडामोडींवर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी शरद पवार यांनी संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली. संजय राऊत हे शिवसेनेचे शिलेदार आहेत जे पूर्वीपासून शिवेसना-राष्ट्रवादी यांच्यातील दूवा म्हणून काम करत आहेत. संजय राऊत यांच्या मध्यस्थीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात ४५ मिनिटांची बैठक पार पडली. शिवसेनेला आघाडीचे पाठिंब्याचे पत्र न मिळाल्याने शिवसेनेची कोंडी झाली. अशा पार्श्वभूमीवर कुठेतरी शिवसेनेचा गेम झाला का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यादरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरवरुन पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. प्रयत्न करणाऱ्यांचा पराजय होत नाही, आम्ही यशस्वी होऊ, निश्चित होऊ असं राऊतांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे तिन्ही पक्ष मिळून सत्तास्थापन करण्याची शक्यता अद्यापही कायम आहे.