काँग्रेसने 'ती' चूक पुन्हा करू नये, शिवसेनेसोबत आघाडीस संजय निरुपम यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 01:30 PM2019-11-21T13:30:57+5:302019-11-21T14:13:34+5:30
शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा उघडपणे विरोध केला आहे.
मुंबई - जवळपास महिनाभर चाललेल्या सत्तापेचानंतर आता महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेनेला पाठिंबा देण्याच काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडनीही हिरवा कंदिल दाखवला आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचे मुंबईतील ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा उघडपणे विरोध केला आहे. काही वर्षापूर्वी काँग्रेसने बसपाला पाठिंबा देऊन चूक केली होती. तशी चूक पक्षाने पुन्हा करू नये. तसेच शिवसेनेसोबत सत्तेस जाणे म्हणजे आपल्या पक्षाला जमिनीत गाडून घेण्यासारखे ठरेल, अशी भीती निरुपण यांनी व्यक्त केली आहे.
भाजपाला सत्तेत दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमधील चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पुढच्या आठवडाभरात राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्यास उघडपणे विरोध केला आहे.
शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध करणाऱ्या ट्विटमध्ये संजय निरुपम म्हणतात की, ‘’काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून काँग्रेसने चूक केली होती. तेव्हापासून त्या राज्यात काँग्रेसची सुरू झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही. आता महाराष्ट्रामध्ये आम्ही तीच चूक करत आहोत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनणे हे काँग्रेसला जमिनीत दफन करण्यासारखे ठरेल. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाबाबत काँग्रेस अध्यक्षांनी दबावात येऊ नये.’’
वर्षों पहले उत्तर प्रदेश में #BSP के साथ गठबंधन करके काँग्रेस ने गलती की थी।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 21, 2019
तब से ऐसी पिटी कि आज तक नहीं उठ पाई।
महाराष्ट्र में हम वही गलती कर रहे हैं।
शिवसेना की सरकार में तीसरे नंबर की पार्टी बनना कॉंग्रेस को यहां दफन करने जैसा है।
बेहतर होगा,काँग्रेस अध्यक्ष दबाव में न आएं।
दरम्यान, राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती ही शिवसेनेमुळे ओढवली आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेच्या चुकीसाठी स्वत:ची फरफट करून घेऊ नये असे निरुमप यांनी म्हटले आहे.