मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या घोळामध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तास्थापनेच्या नाट्यातून भाजपा बाहेर पडली आहे असं वाटत असताना नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मात्र गडकरी आमचे मित्र आहेत पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे, क्रिकेट मध्ये बॉल दिसत असतो पण भाजपला बॉल दिसला नाही असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गडकरींना लगावला आहे.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना खूप उशीरा भेटले, आम्ही आधीच राज्यपालांना भेटलो, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना मदत करावी म्हणून आधी विनंती केली आहे. तसेत राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल, तुम्हाला जास्त वेळ थांबावं लागणार नाही. मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद याबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील असं त्यांनी सांगितले.
तसेच आशिष शेलार यांनी राज्यात तीन अंकी नाट्याचा प्रयोग सुरु आहे अशी टीका महाशिवआघाडीवर केली होती. त्यावर तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही, म्हणून बोलत आहे असा टोला बाळासाहेब थोरातांनी शेलारांना लगावला आहे.
क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. आपण सामना गमावत आहोत, असं कधी कधी वाटू लागतं. मात्र त्यानंतर वेगळाच निकाल समोर येतो, अशा शब्दांमध्ये केंद्रीय भूपृष्ठमंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींनी राज्यातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं होतं. मात्र राज्यात कोणाचं सरकार येईल, याबद्दल मला कल्पना नसल्याचं ते म्हणाले. भाजपानं राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनं सरकार स्थापनेच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गडकरींनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण आणि सूचक मानलं जातं होतं.
दरम्यान, चिंता करु नका, वेळ लागेल पण सरकार आपलंच येणार’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजप आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला होता. तुम्ही मुंबईला आता यायचं नाही. इथून निघून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा अन् त्यांचं दु:ख हे आपलं दु:ख असल्याचं मानून कामाला लागा, असे ते म्हणाले होते.