Join us

Maharashtra Government: फडणवीसांची बालिश विधाने त्यांच्यावरच उलटली; संजय राऊतांचा रोखठोक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 8:06 AM

तसेच दिल्लीच्या भरवशावर व फाजील आत्मविश्वासावर हे राजकारण महाराष्ट्राचा नाश करणारेच ठरले.

मुंबई - महाराष्ट्रात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याने दिवसाढवळय़ा शपथ घेतली. महाराष्ट्रात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही व पवारांचे राजकारण संपले, अशी बालिश विधाने देवेंद्र फडणवीस यांनी केली. ती त्यांच्यावरच उलटली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पवारांनी त्यांच्या मनात होते ते करून दाखवले. ही चांगल्याची सुरुवात आहे. अशा शब्दात संजय राऊतांनी रोखठोक भूमिका सामनातून मांडली आहे. 

यामध्ये संजय राऊत म्हणतात की, महाराष्ट्र दिल्लीच्या झुंडशाहीपुढे झुकला नाही. महाराष्ट्राचे पाणीच वेगळे आहे. हे गेल्या महिनाभरातील घडामोडींमुळे स्पष्ट झाले. लाखो जनसागरास साक्ष ठेवून घेतलेली ही शपथ देशाचे राजकारण बदलून टाकेल. ‘महाराष्ट्रात विरोधी पक्ष उरणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हाच प्रमुख विरोधी पक्ष असेल. शरद पवार यांचे ‘पर्व’ संपले आहे, अशी बालिश विधाने करणारे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाले. ‘मी पुन्हा येईन’ असे ते सांगत होते; पण पुन्हा येण्याची अति घाई त्यांना नडली व फक्त 80 तासांचे त्यांचे सरकार भारतीय जनता पक्षाला घेऊन बुडाले असंही त्यांनी सांगितलं. 

तसेच दिल्लीच्या भरवशावर व फाजील आत्मविश्वासावर हे राजकारण महाराष्ट्राचा नाश करणारेच ठरले. पडद्यामागे अनेक घडमोडी घडल्या. ‘सिंहासन’ चित्रपटातील नवी पटकथा जणू महाराष्ट्रात लिहिली गेली. सत्तेचे राजकारण व खुर्चीचा खेळ महाराष्ट्राने पाहिला, तो रोमांचक होता. त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या नाटय़मय घडामोडी कधीच घडल्या नाहीत. शरद पवार यांच्याशिवाय राजकारण अळणी आणि बेचव आहे व शरद पवार यांनी मनात आणले तर कोणतीही उलथापालथ घडवू शकतात यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा लागला. त्याचवेळी एका दंतकथेचा कायमचा नायनाट झाला असं संजय राऊतांनी सांगितले. 

शरद पवार यांचे राजकारण विश्वसनीय नाही. पवारांचे राजकारण फसवाफसवीचे आहे या दंतकथेवर आता तरी कायमचा पडदा पडावा. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. राज्यात सत्तांतर झाले यावर आजही विश्वास ठेवायला लोकं तयार नाहीत. त्याहीपेक्षा मोदी-शहा यांचे बलाढ्य राज्य उलथवून महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आला हे महत्त्वाचे अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारप्रकाश आंबेडकरभाजपा