मुंबई - सत्तास्थापनेच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत शरद पवार, अजित पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक होऊन चर्चा होणार आहे. आमच्या दोन पक्षात एकवाक्यता झाल्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी दिली आहे.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की,महत्वाच्या पदासंदर्भात चर्चा होईल आणि मार्ग काढला जाईल. तसेच या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चा करण्यासाठी ही समिती ठरविली गेली. महाराष्ट्रातील चर्चा लवकरात लवकर संपविण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे नवीन वर्षापूर्वीच राज्यात सरकार येईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
तसेच या बैठकीला मार्गदर्शन करताना शरद पवारांनी मध्यावधी निवडणुका लागणार नाही, चिंता नसावी असं आमदारांना सांगितले आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं वक्तव्य भाजपा नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्याचसोबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडत आहे. यामध्ये बुथप्रमुखापासून ते प्रदेशाध्यक्ष निवडीपर्यंतचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात भाजपा मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागली आहे असं चित्र निर्माण झालं आहे.
दरम्यान, सत्तासंघर्षाच्या या घोळामध्ये भाजपानेही सत्तास्थापन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. बहुमताचा आकडा १४५ आमदार जुळविताना भाजपा खासदार नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहेत. मात्र यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवारांनी नारायण राणेंना दिलं आहे.