Maharashtra Government: शेतकरी राजा जगला तर सरकार जगेल! शेतकऱ्यांचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 06:39 AM2019-11-29T06:39:52+5:302019-11-29T06:42:40+5:30
गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी दुर्लक्षित राहिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणत्याच सरकारचे लक्ष नाही. परिणामी, शेतक-यांसमोरील प्रश्नांचा डोंगर वाढत आहे.
- सचिन लुंगसे
मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून शेतकरी दुर्लक्षित राहिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणत्याच सरकारचे लक्ष नाही. परिणामी, शेतक-यांसमोरील प्रश्नांचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे आता राज्यात नव्याने स्थापन झालेल्या ‘ठाकरे सरकार’ने शेतकºयांचा सातबारा कोरा करत त्याला कर्जमुक्त केले पाहिजे. कारण शेतकरी जगला तरच सरकार जगेल, असा एकमुखी सूर शेतकºयांनी लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला राज्याच्या कानाकोपºयातून शिवसैनिक आणि शेतकरी राजा दाखल झाला होता. त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. या वेळी शेतकरी राजाने उद्धव ठाकरे यांंना शुभेच्छा देतानाच खूप साºया अपेक्षा व्यक्त केल्या.
अहमदनगर येथून शिवाजी पार्कवर दाखल झालेले खंडागळे-पाटील आणि त्यांचा समूह म्हणाला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे. आम्हाला या सरकारकडून खूप साºया अपेक्षा आहेत. पहिले म्हणजे शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि शेतकºयांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून ‘ठाकरे सरकार’ने पावले उचलली पाहिजेत.
पुण्याहून दाखल झालेले शेतकरी किसन ढोले आणि त्यांचा समूह म्हणाला, राज्यात सेनेचे सरकार आले याचा आनंद झाला. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले याचाही आनंद झाला. मात्र आता सरकारने शेतकºयांना दिलासा दिला पाहिजे. अहमदनगर येथून दाखल झालेले शेतकरी नामदेव दातीर यांनी राज्यातल्या सरकारमध्ये काँग्रेस सत्तेवर असल्याबाबत समाधान व्यक्त करतानाच सरकारने आता शेतकºयांच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडण्यापूर्वी राज्यभरातील शेतकºयांचे जथ्येच्या जथ्ये शिवाजी पार्कच्या दिशेने आगेकूच करत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाशी निगडित असलेले, कार्यकर्ते असलेले शेतकरी या वेळी केवळ आणि केवळ शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे; आणि शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत या एकाच मुद्द्यावर जोर देत होते.
सरकार, शेतकरी राजाचे एवढे ऐकाच...
शेतक-यांची कर्जे माफ झाली पाहिजेत. शेतकºयांचा जो माल बाजारपेठेत येतो, त्याला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ते थांबले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलली पाहिजेत.
मागच्या सरकारने ज्या चुका केल्या त्या चुका या सरकारने करता कामा नयेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून शेतकºयांना फार अपेक्षा आहेत. कित्येक वर्षांपासून शेतकरी दुर्लक्षित राहिला आहे.
पाऊस पडत नाही. पडला तर एवढा पडतो की तोंडी आलेला घास हिरावला जातो. पीक नीट येत नाही. आले तर त्याला नीट भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. नदी आहे पण नदीला पाणी नाही; आणि पाणी असले तरी डोक्यावर असलेले कर्ज फेडताना हातात काही राहत नाही. अशा अनेक समस्या आहेत. काय आणि कोणत्या म्हणून सांगायच्या. सगळ्या वर्गांना न्याय मिळतो; पण शेतकरी कायम दुर्लक्षित राहतो.
नव्या सरकारने पहिल्यांदा प्रश्न समजावून घेतले पाहिजेत. त्यावर तोडगा काढताना शेतकºयांशी संवाद साधला पाहिजे.
‘मी शेतकरी मुख्यमंत्री’ : डोक्यावर टोपी, गळ्यात गमजा, कंबरेला धोतर आणि मुखी शिवसेना; अशाच काहीशा वेशात शेतकरी राजा गुरुवारी सकाळपासून शिवाजी पार्कवर दाखल होत होता. शिवाजी पार्कवर दाखल होण्यापूर्वी शिवसेना भवन येथेही हजेरी लावत होता. ‘मी शेतकरी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे फलक दर्शवित तो मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होता.