मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी १४५ आमदारांचे संख्याबळ पाठिशी हवं. यासाठी राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येत महाशिवआघाडीच्या माध्यमातून सरकार बनविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तत्पूर्वी भाजपा खासदार नारायण राणे यांनी भाजपही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे सत्ता आणण्यासाठी जे हवं ते ते करेन असं सांगितल्याने इतर पक्षातील आमदार फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मात्र आमदार फुटण्याच्या या शक्यतेवर शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी इशारा दिला आहे. शिवसेना आमदार फोडणं कोणाला शक्य नाही, जर कोणी असा प्रयत्न केला तर त्याचं डोकं फुटेल.सत्तास्थापनेवेळी आमदार वेळेत पोहचता यावेत त्यासाठी शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितले आहे. गेल्या १० दिवसांपासून शिवसेना आमदारांना मालाडच्या द रिट्रिट हॉटेलला ठेवण्यात आलं होतं. मात्र बुधवारी रात्री सगळे आमदार पुन्हा मतदारसंघात परतले आहे.
शिवसेना आमदार आपापल्या मतदारसंघात जाण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक आमदाराला शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करण्यास सांगितलं आहे अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली आहे.
दरम्यान, बहुमताचा आकडा १४५ आमदार जुळविताना भाजपा खासदार नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहे. मात्र यावर अजित पवारांनीही त्यावर भाष्य केलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवारांनी नारायण राणेंना दिलं आहे.