मुंबई : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेला मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्ष तातडीने सुरू करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून केली. त्यावर राज्यपालांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.या कक्षाचे कामकाज राष्ट्रपती राजवट लागल्यापासून बंद करण्यात आले आहे. या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ६० हजार रुग्णांना ६०० कोटी रूपयांची मदत देण्यात आली आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सर्व मंत्री कार्यालये रिकामी करण्यात आली. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षही बंद करण्यात आला. यामुळे मदतनिधीच्या प्रतीक्षेत असलेले साडेपाच हजार रुग्ण हवालदिल झाले. दुसरीकडे शेतकरीही ओल्या दुष्काळामुळे हवालदिल असून न्याय कोण देणार या प्रतीक्षेत आहे, याकडे फडणवीस यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले.शिवसेना आमदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्यात यावा, यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेतली. साहायता निधीसाठीचे अनेक अर्ज प्रलंबित असून राष्ट्रपती राजवटीचे कारण देऊन सदर कक्षांतून सर्वसामान्यांना देण्यात येणारी मदत बंद न करता रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तत्काळ सुरू करण्याबाबतचे पत्र उदय सामंत यांनी मुख्य सचिवांना दिले.
Maharashtra Government: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तत्काळ सुरू करा, देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 4:34 AM