Maharashtra Government: 'शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 08:02 AM2019-12-04T08:02:53+5:302019-12-04T08:03:34+5:30
साम, दाम, दंड, भेदांच्या पलीकडे काहीतरी चालले आहे व त्याचा स्फोट पवार यांनी केला तसा स्वतंत्र बाण्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी केला.
मुंबई - निवडणूक प्रचारात अमित शहा यांचे सांगणे होते की, ‘पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?’ याचे उत्तर पवारांनी नंतर योग्य शब्दात दिले. जर पवारांनी काय केले ही शंका अमित शहा वगैरेंना असेल, तर मग कोणत्या अनुभवाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता? पवारांचा अनुभव आहेच, पण तो देशासाठी कामी यावा यासाठी मोदी–शहा यांना साडेपाच वर्षे का लागावीत? हा प्रश्नच आहे असा टोला सामना अग्रलेखातून शिवसेनेने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना लगावला आहे.
तसेच महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल अशा इशाराही शिवसेनेने भाजपाला दिला आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- महाराष्ट्राचे राजकारण उत्तर धुवावरून दक्षिण धुवावर पोहोचले आहे, पण या प्रवासात भारतीय जनता पक्षाचे जे हसे झाले आहे त्याच्या रंजक कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत.
- शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये किंवा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ नये यासाठी पडद्यामागे जे भव्य नेपथ्य आणि दिग्दर्शन सुरू होते ते नाटय़ शरद पवार यांनीच समोर आणले आहे. शरद पवार झुकले नाहीत. काँग्रेसने शहाणपण दाखवले आणि शिवसेना दबावतंत्राची पर्वा न करता भूमिकेवर ठाम राहिली.
- काही झाले तरी शिवसेनेबरोबर नाते तोडायचे. ते हिंदुत्व वगैरे जे काय आता बोलले जाते ते कुचकामाचे. शिवसेनेला वाकवायचे, वाकले नाही तर दूर ढकलायचे हे धोरण आधीच ठरले होते. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायचा होताच व ते ‘नाटय़’ तयारच होते. त्यासाठी शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा देशाला करून घेणाऱ्यांना ही उपरती आधी का झाली नाही?
- नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे ‘नॅचरल करप्ट पार्टी’ अशी दूषणे प्रचारात दिल्लीच्या भाजप नेत्यांनी दिली. मग अशा पार्टीकडून त्यांना कोणत्या अनुभवाची जंगी ‘पार्टी’ हवी होती हे रहस्यच आहे. निवडणुकीच्या आधी पवार यांना ‘ईडी’ची नोटीस पाठवून दबाव आणला.
- प्रफुल्ल पटेल यांनाही चौकशीसाठी बोलावून टांगती तलवार ठेवली. खरे तर पटेल यांच्या बाबतीतले हे प्रकरण दोन-तीन दशकांपूर्वीचे. पण ‘ईडी’ने ते निवडणुकीच्या निमित्ताने शोधून काढले व त्या प्रकरणाचा उल्लेख भाजप नेते लोकसभा निवडणुकीपासून करू लागले.
- हीच विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्याची भ्रष्ट तयारी होती. हा अनुभव देशाची जनता नव्याने घेत आहे. साम, दाम, दंड, भेदांच्या पलीकडे काहीतरी चालले आहे व त्याचा स्फोट पवार यांनी केला तसा स्वतंत्र बाण्याचे उद्योगपती राहुल बजाज यांनी केला.
- तुमच्या राज्यात मोकळेपणाने बोलण्याचे, भयमुक्त जगण्याचे स्वातंत्र्य राहिले नाही, असे बजाज यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना तोंडावर सांगितले. शिवसेनेने स्वाभिमान दाखवला. पवार यांनी दबाव झुगारला. राहुल बजाज यांनी ‘भय’ व ‘झुंडी’चे शास्त्र सांगितले. ही हिमतीची कामे आपल्या महाराष्ट्रातच झाली.
- हिमतीने जगण्याचा अनुभव जितका महाराष्ट्राला आहे तितका तो अन्य राज्यांना नसावा. मर्जीतले उद्योगपती आणि दलालांसाठी महाराष्ट्राला चरकात टाकून पिळण्याचे काम सुरू होते व हे चरकातले पिळणे पाहून दिल्लीवाले खूश होत असावेत. महाराष्ट्राचे हे ‘पिळणे’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थांबवले.
- आता असे नवे अनुभव पुढेही येऊ लागतील व दिल्लीने त्याची सवय ठेवली पाहिजे. पवारांच्या अनुभवाचा फायदा आता नव्या सरकारला, पर्यायाने महाराष्ट्राला मिळेल. पवारांचे आमदार 55 पेक्षा कमी झाले असते तर त्यांच्या अनुभवाची शिदोरी भाजपास पचनी पडली नसती.