मुंबई : महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, आता त्यांच्या संभाव्य मतदारसंघांबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे लोकांमधून निवडून येत विधानसभा गाठणार की विधान परिषदेचा मार्ग निवडणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केले. मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदासाठी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व असणे आवश्यक आहे. मात्र, उद्धव ठाकरे सध्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. पुढील सहा महिन्यांत त्यांना विधानसभा अथवा विधान परिषदेचे सदस्य होणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य मतदारसंघाबाबत उत्सुकता आहे. पहिल्याच दिवशी माहिम विधानसभा मतदारसंघाचे नाव चर्चेत आले आहे. शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान असणारे शिवाजी पार्क याच मतदारसंघात येते. दादर, प्रभादेवी आणि माहिम परिसराचा समावेश असणारा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या शिवसेनेचे सदा सरवणकर येथील आमदार आहेत. विशेष म्हणजे, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाचा शोध सुरू होता, तेव्हा माहिमचाही विचार करण्यात आला होता.आदित्य यांच्यासाठी वरळीतील तत्कालीन आमदार सुनील शिंदे यांना जागा सोडावी लागली होती. आता, उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचा मार्ग पत्करल्यास एखाद्या विद्यमान आमदाराला राजीनामा देत जागा रिकामी करावी लागेल. माहिम, शिवडीसह किमान बारा तेसोळा मतदारसंघ शिवसेनेसाठी अगदीच अनुकूल गटात मोडणारे आहेत.मात्र, विद्यमान आमदाराचा राजीनामा घेण्यापेक्षा विधान परिषदेचाही विचार होऊ शकतो. तसेही माजी मंत्री तानाजी सावंत विधानसभेत निवडून आल्याने विधान परिषदेतील त्यांची जागा रिकामी झाली आहे. याशिवाय अन्यही काही नेते विधानसभेवर निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळही पुरेसे असल्याने परिषदेची वाट तुलनेने सोपी ठरणार आहे. त्यामुळे विधान परिषदेला पसंती दिली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.शपथविधी झाल्यानंतर याबाबत होणार विचारउद्धव ठाकरे यांच्या संभाव्य मतदारसंघाची चर्चा असली, तरी पक्षात मात्र अद्याप याबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही. राज्यातील राजकीय नाट्यात आता कुठे समीकरणे स्पष्ट होत आहेत. शपथविधी झाल्यानंतर याबाबत विचार होऊ शकतो. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत. राज्यात कोठेही ते निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे हा काही फार चिंतेचा आणि चिंतनाचा विषय नसल्याची भावना शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. शिवाय, विधान परिषदेचाही पर्याय खुला असल्याचे या नेत्याने सांगितले.
उद्धव ठाकरे कुठून लढणार? माहीम, शिवडी की विधानपरिषदेची शिडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 7:13 AM