शपथ घेताना मंत्र्यांनी केले महामानवांचे, नेत्यांचे स्मरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 06:46 AM2019-11-29T06:46:03+5:302019-11-29T06:47:37+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील छोटेखानी मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना प्रत्येकाने सुरुवातीला महामानवांचे, थोरपुरुषांचे व आपापल्या नेत्यांचे स्मरण केले आणि त्यांना वंदन केले.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील छोटेखानी मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना प्रत्येकाने सुरुवातीला महामानवांचे, थोरपुरुषांचे व आपापल्या नेत्यांचे स्मरण केले आणि त्यांना वंदन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की... अशी सुरुवात करीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शपथ घेतली.
‘जय शिवराय, महात्मा फुले-छत्रपती शाहू महाराज, सावित्रीमाता फुले यांना तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळास वंदन करुन, शरद पवार यांच्या आदेशावरून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी मी शपथ घेत आहे’, असे एकेकाळचे शिवसैनिक असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले. शपथ घेतल्यानंतर त्यांनी, ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती’ अशी घोषणा दिली.
शिवसेनेचे ठाण्यातील नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले, ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा धर्मवीर असा उल्लेख करीत त्यांचे स्मरण केले आणि आईवडिलांच्या पुण्याईने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने शपथ घेत असल्याचे ते म्हणाले. तेव्हा शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
पाटील, राऊत यांनी केला आईच्या नावाचा उल्लेख
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवार यांना वंदन करून शपथ घेताना आपले नाव, ‘जयंत कुसुम राजाराम पाटील’ असे घेतले. काँग्रेसचे नितीन राऊत स्वत:च्या नावाचा उल्लेख ‘मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत’ असा केला. राऊत यांनी आदरणीय सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या तर बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्या आशीर्वादाने शपथ घेत असल्याचे सांगितले.