ना मोदींनी फोन केला, ना अमित शाहांनी; भाजपामुळेच आली ही वेळः उद्धव ठाकरेंचा 'बाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 05:48 PM2019-11-22T17:48:36+5:302019-11-22T17:58:19+5:30
Maharashtra News : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्ण करू शकणार आहेत.
मुंबईः महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी तयार झाल्यानं अखेर महिन्याभरानंतर राज्याला सरकार मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकासआघाडीचा किमान समान कार्यक्रम आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही जवळपास तयार झाला आहे. त्यात मुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिलं जाणार आहे. त्यामुळे ज्या कारणावरून शिवसेनेनं भाजपाशी संपर्क तोडला, ती मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना मिळताना दिसत आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दिलेलं वचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्ण करू शकणार आहेत. मात्र, आजही भाजपावरचा त्यांचा राग कमी झालेला नसल्याची प्रचिती आज मातोश्रीवरील आमदारांच्या बैठकीदरम्यान आली.
भाजपाकडून शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याचं वृत्त आज काही माध्यमांनी दिलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असतानाच, ही बातमी आल्यानं शिवसैनिकांच्या मनाची चलबिचल झाली होती. कारण, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्यास आजही काही आमदार फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे पुन्हा वेगळी समीकरणं तयार होतात का, असं वाटू लागलं होतं. परंतु, भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही आणि आता कुणी इंद्रपद देत असेल तरी ते नको, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. तोच धागा पकडत, उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यापैकी कुणीही आपल्याला फोन केलेला नाही. केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी संपर्क साधला होता. परंतु, दिल्लीच्या नेत्यांकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही. आजच्या परिस्थितीला भाजपाच जबाबदार आहे. त्यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झालीय. आपल्याला वेगळी आघाडी करून सत्ता स्थापन करावी लागत आहे. भाजपा वचनावर ठाम राहिली असती तर हा दिवस आलाच नसता, असं नमूद करत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्तापेचासाठी भाजपाला जबाबदार ठरवलं.
दरम्यान, भाजपा-शिवसेना महायुतीला जनतेनं कौल दिलेला असतानाही, मुख्यमंत्रिपदावरून या भावांचे बंध तुटलेत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शब्द भाजपानं दिला होता, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर, असं काही ठरलं नव्हतं, असा भाजपाचा दावा आहे. त्यावरून त्यांच्यात बरीच रस्सीखेच झाली आणि हे प्रकरण तुटेपर्यंत ताणलं गेलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केले होते, पण ते उद्धव ठाकरेंनी घेतले नव्हते. तसं त्यांनी स्वतःही पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. आपल्याला खोटं ठरवणाऱ्यांशी संपर्क कशाला ठेवायचा?, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यानंतरच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं निश्चित केलं होतं.
शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण?
शिवसेनेच्या सर्वच्या सर्व आमदारांनी आजच्या बैठकीत, उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु, स्वतः उद्धव मुख्यमंत्री होण्याबाबत फारसे सकारात्मक नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन मी त्यांना दिलं होतं. त्यामुळे आपण स्वतः मुख्यमंत्री होणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी बैठकीत मांडली. मुख्यमंत्री निश्चितीसाठी थोडं थांबा, असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं.
राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहण्यापेक्षा उद्धव ठाकरेंची पसंती पक्षप्रमुखपदालाच आहे. ते मुख्यमंत्री झाल्यास शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी कुणाकडे सोपवायची, हा प्रश्न आहे. राज्यभरात पक्ष वाढवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी सक्षमपणे केलं आहे. शिवसैनिकांचं त्यांच्याशी असलेलं नातं पाहता, हे काम तेच अधिक प्रभावीपणे करू शकतात.
Mumbai: Congress leader Mallikarjun Kharge and Shiv Sena Chief Uddhav Thackeray arrive at Nehru Centre for Congress-Shiv Sena-NCP meeting. #Maharashtrapic.twitter.com/7mmRyEbaez
— ANI (@ANI) November 22, 2019
महत्त्वाच्या राजकीय बातम्या
महाविकासआघाडीचं सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही - नितीन गडकरी
शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा
'महाविकास आघाडी'मुळे पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्गही खडतर
''शरद पवार कधी काय करतील हे अजितदादांना समजलं नाही, तर आम्हाला काय समजणार''