Join us

Maharashtra Government: अब आयेगा मजा; सत्तासंघर्षात नारायण राणेंच्या एन्ट्रीवरुन भाजपा आमदाराचं ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 8:22 AM

मंगळवारी नारायण राणे यांनी भाजपा विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्याने राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी अद्यापही शिवसेनेला थेट पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला नाही त्यामुळे राज्यात चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. मात्र या सत्तासंघर्षावर बारीक लक्ष आहे असं भाजपाकडून सांगण्यात येत असलं तरी भाजपाचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी यावर भाष्य केल्याने अब आयेगा मजा अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणेंनी ट्विट केलं आहे. 

मंगळवारी नारायण राणे यांनी भाजपा विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नारायण राणे म्हणाले की, भाजपा सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार आहे. आमदार १४५ व्हावेत यासाठी प्रयत्न असतील. सत्तास्थापनेसाठी विलंब होणं अयोग्य आहे. फडणवीस यांनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे राणे म्हणाले. 

तसेच सत्ता येण्यासाठी जे जे करावं लागेल ते करेन. ही माहिती देणं बरोबर वाटत नाही. येणारे आमदारही थांबतील. शिवसेनाकाँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ शकेल असं वाटत नाही. शिवसेनेला आमदारांना डांबून ठेवावे लागेल, असा इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला. साम दाम दंड भेद हे शिवसेनेचंच आहे, असं जे बोलले ते हॉस्पिटलमध्ये आहेत. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उल्लू बनवत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. एवढी वर्षे राजकारण करतात, असा टोलाही राणे यांनी लगावला.

दरम्यान, शिवसेना नैतिकतेला धरून वागली नाही. महायुतीमध्ये बहुमत मिळाले होते. युती म्हणजे वचन असते ते शिवसेनेने पाळले नाही, असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील सत्तास्थापनेच्या निमित्ताने नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राज्याच्या राजकारणात पाहायला मिळणार आहे. मात्र या सर्व राजकीय नाट्यमय घडामोडीत अखेर सरकार कोणाचं बनणार हे पाहणं गरजेचे आहे. 

टॅग्स :नारायण राणे नीतेश राणे राजकारणदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस