मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी भाजपा, शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं हे दोन्ही पक्ष सरकार बनविण्यात असमर्थ ठरले असून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचं दिसून येत असल्याने राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेत केंद्रीय गृहमंत्रालयाला ही शिफारस पाठविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १८ दिवस उलटले तरीही राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार स्थापन होऊ शकले नाही. राज्यपालांनी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला निमंत्रण पाठविले पण या तिन्ही पक्षांना सरकार बनविण्यात अपयश येत असल्याचं लक्षात घेऊन राज्यपालांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राष्ट्रपती राजवटीची शिफारस पाठविली आहे अशा संदर्भात इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी बातमी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेला आहे.
सोमवारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांनी भेट घेतली. या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही असा विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात अद्यापही शिवसेना-महाआघाडी यांच्या सत्तास्थापनेबाबत आशा काही नेत्यांना लागून राहिली होती.
राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. आज रात्री ८.३० पर्यंत राष्ट्रवादीला राज्यपालांना उत्तर देण्यासाठी मुदत आहे. यावर अजित पवार म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र मिळून निर्णय घेतला तर त्यातून काही मार्ग निघेल. जयपूरहून काँग्रेसचे नेते दिल्लीला गेले. आज ते महाराष्ट्रात येतील त्यानंतर त्यांच्याशी चर्चा होणार आहे. आम्ही दोघांनी एकत्र निवडणुका लढल्या आहेत दोघं मिळून निर्णय घेण्याची गरज आहे. शिवसेना-भाजपाचं बिनसलं म्हणून शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. राज्यपालांनी २४ तासाचा वेळ राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे असं त्यांनी सांगितले मात्र शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय राज्यात सत्ता आणणं कठीण आहे असचं चित्र सध्या दिसत आहे.