Maharashtra Government: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष पुन्हा सुरु करा; महाशिवआघाडीचे नेत्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 08:07 AM2019-11-15T08:07:50+5:302019-11-15T08:08:40+5:30
मात्र राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे.
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा घोळ सुटत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. मात्र याचा परिणाम मुख्यमंत्रीवैद्यकीय सहाय्यता कक्षावर दिसून आला आहे. मंत्रालयातील ७ व्या मजल्यावर सुरु असणारा हा कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गरजू लोकांना मदतीसाठी ताटकळत राहावं लागणार असं चित्र सध्या निर्माण झालं आहे.
मात्र राष्ट्रपती राजवटीमुळेमुख्यमंत्रीवैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील हजारो रुग्णांना शासनाकडून मिळणारी वैद्यकीय मदत बंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी गरीब रुग्णांना दिलासा देण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहत विनंती केली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्या संदर्भातील पत्र मी मा. राज्यपालांना लिहिले आहे. मा. राज्यपाल महोदय या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना दिलासा देतीलच अशी अपेक्षा आहे. @BSKoshyaripic.twitter.com/l4Vlw9HUQR
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 14, 2019
धनंजय मुंडे आपल्या पत्रात लिहिलं आहे की 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्याने गरीब रुग्णांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रपती राजवटीत शासनाचा कारभार सुरू ठेवण्याची जबाबदारी घटनेने आपल्यावर दिली आहे. आपल्या अनुमतीने हा कक्ष पुन्हा सुरू करून हजारो रुग्णांना दिलासा द्यावा' अशी विनंती या पत्राद्वारे केली आहे. तसेच या पत्राची दखल घेत हजारो गरीब रुग्णांना राज्यपाल दिलासा देतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनेही याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रपती राजवटीच कारण दाखवून गरीब रुग्णांसाठी असलेला मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद आहे तो तात्काळ चालू करावा असं शिवसेना आमदार उदय सामंत यांनी केली आहे. आज दुपारी १२:०० वा. शिवसेनेचं शिष्टमंडळ मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे त्याचसोबत राज्यपाल आणि मुख्य सचिवांना पत्र देण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. त्यामुळे उपचारांसाठी मदत कुठून आणि कशी मिळवायची असा प्रश्न राज्यभरातून मुंबईत आलेल्या अनेकांना पडला आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाबाहेर गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र कक्षच बंद असल्यानं आता जायचं कुठे असा यक्षप्रश्न गरजूंसमोर उभा राहिला आहे.
राज्यभरातून आलेल्या गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू असल्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला आहे. 'कार्यालय बंद. चौकशी करू नये', असा मजकूर असलेला कागद कक्षाच्या दारावर चिटकवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधून मदतीच्या आशेनं आलेल्या अनेकांचा भ्रमनिरास होत आहे. जवळपास ५ हजार जणांना याचा फटका बसला आहे.