मुंबई - राज्यातल सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची चिन्हे दिसत आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा एकसूत्री कार्यक्रम ठरविण्याचं काम सुरु आहे. तीन पक्षांची चर्चा सुरु आहे. राज्याच्या हितासाठी किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ लागतो पण पुढील २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा हीच आमची इच्छा आहे. मात्र आम्ही मी पुन्हा येईन वारंवार सांगणार नाही, आम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे. राज्यातच राजकारण करायचं आहे अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला आहे. दुष्काळ, ओला दुष्काळ यावर जास्त करावं लागणार आहे. आमच्यासोबत जे लोक जोडले आहेत त्यांचा राज्य चालविण्याचा अनुभव जास्त आहे. २४ तारखेनंतर मी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी सांगतोय, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार येणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्या बातम्या पेरल्या जातायेत त्या कुठून येतात माहित आहे. वीर सावरकरांना सत्ता असतानाही भारतरत्न का दिला नाही? महाराष्ट्राच्या योगदानात यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे, महाराष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येकाचा वाटा राहिला आहे. फॉम्युर्ल्याची चिंता नको, उद्धव ठाकरे ठरवतील असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
त्याचसोबत विभिन्न विचारधारा काय असते? किमान समान कार्यक्रम राज्याच्या हितासाठीच आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयींनी पहिलं सरकार विविध विचारधारेची माणसं येऊन बनलं होतं. शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात यापूर्वीही किमान समान कार्यक्रम ठरवून विभिन्न विचारधारेची लोकांना एकत्र येत सरकार बनविले होतं. शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्र येत असतील त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे असं सांगत संजय राऊतांनी देशात असं सरकार यापूर्वीही बनलं आहे अशी आठवण करुन दिली. दरम्यान, राज्यात भाजपाचं सरकार येईल, चिंता नको असा दावा भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांच्या बैठकीत केला आहे.