- अतुल कुलकर्णीमुंबई : राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शरद पवार यांनी सूत्रे हातात घेतली आणि शनिवारी सायंकाळपर्यंत बहुतेक आमदार परत आणून पक्षात अजूनही आपलाच शब्द प्रमाण असल्याचे सिद्ध केले.अजित पवारांचे बंड आणि राजभवनावर पार पडलेल्या शपथविधीची माहिती मिळताच ८० वर्षांचे शरद पवार आपली राजकीय शक्ती व अनुभव पणाला लावत मैदानात उतरले. सकाळी त्यांनी सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘काळजी करू नका, मी सोबत आहे’ असा धीर दिला. तसेच सेनेचे आमदार सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी काही ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. काँग्रेसच्या दिल्लीहून आलेल्या नेत्यांशीही संवाद साधला. सकाळी ९.३० वाजेपर्यंत प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, सुनील तटकरे हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. अजित पवारांसोबत कोणकोण आहेत, याची खातरजमा करून त्या प्रत्येकाशी स्वत: पवारांनी संपर्क साधला.बहुसंख्य आमदार पक्षासोबत आहेत, याची खात्री पटल्यानंतर ते घराबाहेर पडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते पोहोचले होते. त्यांच्याशी त्यांनी बंदद्वार चर्चा करून पुढील रणनीती ठरविली. डॉ. राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर आणि सुनील भुसारा या अजितदादांसोबत गेलेल्या तीन आमदारांना पत्रकारांसमोर हजर केले. शरद पवारांनी पक्षाची संभाव्य वाताहात थांबविल्याचे लक्षात येताच व्चव्हाण सेंटरवर अजित पवारांच्या विरोधात राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.राष्टÑपतींसमोर आमदारांची परेडकाँग्रेस, राष्टÑवादी व शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रपतीपुढे नेले जाणार आहे. आमच्याकडे बहुमत आहे हे लक्षात येताच राज्यातील फडणवीस सरकार राष्ट्रपतींना बरखास्त करावे लागेल. त्या दृष्टीनेही आमची चाचपणी सुरू आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
Maharashtra Government: पुतण्याच्या बंडानंतरही शरद पवारांनी सावरला पक्ष
By अतुल कुलकर्णी | Published: November 24, 2019 6:54 AM