मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वाय. बी सेंटरला बैठक झाली. त्या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं. या राज्यात अस्थिरता निर्माण झाली त्यावर पर्यायी सरकार स्थापन करण्याचा सर्वाधिकार शरद पवारांना देण्याचा ठराव पारित केला. यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे. ती समिती आणि शरद पवार एकत्र निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना दिली आहे.
याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, आमच्याकडे बहुमत नाही हे स्पष्ट आहे. काँग्रेसच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन करणे अशक्य आहे. त्यामुळे जो काही निर्णय होईल तो काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय होईल. संध्याकाळी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय होईल असं त्यांनी सांगितले. तसेच सर्व सत्तेत सहभागी होत नाही तोवर महाराष्ट्रात स्थिर सरकार स्थापन होऊ शकत नाही. राज्यभवनाने राष्ट्रपती शिफारस दिली नाही असा खुलासा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे ८.३० पर्यंत आम्हाला वेळ दिलेला आहे असही नवाब मलिक यांनी सांगितले आहे. त्यामुळे अद्यापही सत्तास्थापनेबाबत कोणताही निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत झाला नाही हे दिसून येत आहे.
दरम्यान, सोमवारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांनी भेट घेतली. या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही असा विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात अद्यापही शिवसेना-महाआघाडी यांच्या सत्तास्थापनेबाबत आशा काही नेत्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे रात्री ८.३० पर्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.