मुंबईः शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीचं सरकार महाराष्ट्रात लवकरच स्थापन होईल, असं तीनही पक्षांचे नेते ठामपणे सांगत आहेत. या नव्या आघाडीतील मंत्रिपदांच्या वाटपाचा फॉर्म्युला आज निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यात मुख्यमंत्रिपद पाचही वर्षं शिवसेनेलाच दिलं जाईल, असं समजतंय. स्वाभाविकच, या पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चाही सुरू आहे. त्यात अर्थातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव सगळ्यात पुढे आहे. परंतु, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा आणि त्यांना दिलेल्या वचनानुसार स्वतः उद्धवसाहेबांनी या चर्चेतून आपलं नाव काढून घेतल्याचं समजतं.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत जाण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं काल एकमत झालं. या दोन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी किमान समान कार्यक्रम आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. तो आज शिवसेनेपुढे ठेवून त्याला अंतिम स्वरूप दिलं जाणार असल्याचं समजतं. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मातोश्रीवर झाली. त्यावेळी सर्वच्या सर्व ५६ आमदारांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. परंतु, 'उद्धवसाहेब' मुख्यमंत्री होण्याबाबत फारसे सकारात्मक नाहीत.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असं वचन मी त्यांना दिलं होतं. त्यामुळे आपण स्वतः मुख्यमंत्री होणं योग्य ठरणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडल्याचं बैठकीला उपस्थित असलेल्या व्यक्तीनं सांगितलं. याबाबत थोडी वाट पाहण्याचं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत होणाऱ्या आजच्या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे, संजय राऊत की सुभाष देसाई?
उद्धव ठाकरे यांचा एकंदर सूर पाहता, ते मुख्यमंत्री होणार नाहीत हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे आता अन्य नावांची चर्चा शिवसेनेच्या आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. बहुतांश आमदारांची पसंती एकनाथ शिंदेंना असल्याचं बोललं जातंय. मात्र त्याचवेळी, संजय राऊत यांनी सत्तास्थापनेत बजावलेली भूमिका महत्त्वाची असल्यानं त्यांचं नावही शर्यतीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून राऊत यांचं नाव पुढे येऊ शकतं. त्याशिवाय, सुभाष देसाई हे 'मातोश्री'च्या अत्यंत विश्वासातील शिलेदार आहेत. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभवही असल्यानं त्यांचं नावही चर्चेत आहे.
उद्धव ठाकरे 'रिमोट कंट्रोल'च्या भूमिकेत!
राज्यप्रमुखपदाची सूत्रं सांभाळण्यापेक्षा पक्षप्रमुखपदालाच उद्धव ठाकरे यांची पसंती असल्याचं पहिल्यापासूनच बोललं जात होतं. मात्र, राज्यभरातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्याच नावाला कौल दिला होता. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास शिवसेनेची संघटनात्मक जबाबदारी कोण सांभाळेल, हा महत्त्वाचा विषय आहे. राज्यभरात पक्ष वाढवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी सक्षमपणे केलं आहे. शिवसैनिकांचं त्यांच्याशी असलेलं नातं पाहता, हे काम तेच अधिक प्रभावीपणे करू शकतात. बाळासाहेबांच्या काळापासूनच 'मातोश्री'नं रिमोट कंट्रोल म्हणून भूमिका बजावली आहे. तेच आता उद्धव ठाकरे करू शकतात.
आमदार एकत्र राहणार!
दरम्यान, सत्तास्थापनेबाबतचा अंतिम निर्णय कुठल्याही क्षणी होऊ शकत असल्यानं शिवसेनेच्या सर्व आमदारांना एकत्र राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांना जयपूरला पाठवलं जाणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु, मुंबईतीलच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यात आमदारांवरील विश्वासाचा प्रश्न नसून वेळ वाचावा यादृष्टीने हा निर्णय घेतल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलंय.
महत्त्वाच्या राजकीय बातम्याः
संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...
'आता शिवसेनेला कुणी इंद्राचं आसन दिलं तरीही नको; भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव नाही'
पुणे महापालिकेत 'महाविकास' आघाडी : शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ
उल्हासनगरमध्ये सत्तारूढ भाजपा फुटली; शिवसेनेचा कमळाला 'धोबीपछाड'