Join us

खबरदार, सेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास डोकं फोडू, हातपाय तोडू; शिवसेना नेत्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 2:46 PM

Maharashtra News : राज्यात फोडाफोडीचे राजकारण होण्याचीही शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जर कुणी शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डोके फोडू, असा इशारा

मुंबई - शिवसेना आणि भाजपामधील बेबनावानंतर राज्यात निर्माण झालेला राजकीय पेच आता संपुष्टात येण्याची शक्यता दिसू लागली आहे. एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार स्थापन होणार असे संकेत मिळत आहेत. मात्र दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानेही सरकार स्थापन करण्याची आशा अद्याप सोडलेली नाही. त्यामुळे राज्यात फोडाफोडीचे राजकारण होण्याचीही शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जर कुणी शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे डोके फोडू, हातपाय तोडू, असा सज्जड दम शिवसेना आमदारअब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अब्दुल सत्तार म्हणाले की, राज्यातील सत्तास्थापनेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट होत आले आहे. सत्तावाटपावर अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील आठवडाभरात राज्यात नवे सरकार स्थापन होईल. दरम्यान, राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत कुणीही आमदार फोडण्याचा प्रयत्न करू नये. त्यातही असे प्रयत्न कुठला पक्ष वा नेत्याने केला तर त्याचे डोके फोडले जाईल. प्रसंगा हातपाय तोडू, असा इशारा अब्दुल्ल सत्तार यांनी दिला आहे.  

 दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीतील चर्चा जवळपास पूर्ण होत आली आहे, आता  पुढील घडामोडी  मुंबईतून होतील. सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला अंतिम रूप देण्यासाठी तिन्ही पक्षांची बैठक मुंबईत होणार असून, पुढच्या दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली.

राज्यातील सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, ‘’सरकार स्थापन करण्या्संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यांचे माझ्याशी बोलणे झाले आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीसुद्धा फोनवरून चर्चा झाली आहे. काल झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत किमान समान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. आता पुढच्या दोन दिवसांत अंतिम निर्णय होणार आहे.’’

टॅग्स :शिवसेनाआमदारअब्दुल सत्तारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019महाराष्ट्र सरकार