- यदु जोशीमुंबई : शिवसेनेत गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही विधान परिषदेच्याच सदस्यांचा मंत्र्यांमध्ये भरणा असेल का? अशी चिंता विधानसभेच्या नव्या-जुन्या सदस्यांना सतावत आहे. गेल्या वेळी तर याबाबत विधानसभेच्या सदस्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली होती.फडणवीस सरकारमध्ये सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, डॉ.दीपक सावंत असे चौघे विधान परिषद सदस्य मंत्री होते. शेवटच्या टप्प्यात विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपल्याने सावंत यांचे मंत्रिपद गेले; पण शेवटच्या विस्तारात तानाजी सावंत यांची वर्णी लागली तेही विधान परिषद सदस्यच होते. सोबतच राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळाले. ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे विधानसभा सदस्य विस्तारातही मंत्रिपदापासून वंचित राहिले होते. तानाजी सावंत हे आता विधानसभेवर निवडून गेले आहेत.यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. विधानसभेचे सदस्य असलेलेएकनाथ शिंदे हेही मंत्री झाले आहेत. विधानसभेच्या ज्येष्ठ सदस्यांची शिवसेनेकडे मोठी संख्या आहे. त्यामुळे विस्तारात त्यांना संधी मिळते का या बाबत उत्सुकता आहे. विधान परिषदेच्या सदस्यांना जादा संधी पुन्हा मिळाली तर आपल्याला मंत्रिपदापासून एकतर वंचित राहावे लागेल किंवा राज्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ विधानसभा सदस्यांना आहे.ज्येष्ठ सदस्यांमध्ये संदीपान भुमरे, भास्कर जाधव यांचा समावेश आहे. त्यातील जाधव हे शिवसेना-राष्ट्रवादी-शिवसेना असा प्रवास करून आलेले आहेत. त्यानंतर आशीष जयस्वाल, गुलाबराव पाटील, अनिल बाबर हे ज्येष्ठ आहेत.संजय शिरसाट, भरतशेठ गोगावले, चिमणआबा पाटील, रवींद्र वायकर, संजय राठोड, संजय रायमूलकर, शंभूराज देसाई, राजन साळवी, उदय सामंत यांचा समावेश होतो. सामंत हे पूर्वी राष्ट्रवादीत होते. राठोड हे फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री होते. ते पश्चिम विदर्भाचे आहेत.पूर्व विदर्भाला आतापर्यंत शिवसेनेने मंत्रिपद दिलेले नाही. मंत्रिपदासाठी सुनील प्रभू, दीपक केसरकर, प्रकाश आबिटकर हेही उत्सुक आहेत.गेल्या सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांचा विचार करता मुंबई, ठाण्याचे प्राबल्य होते. यावेळी विभागीय संतुलन साधले जाईल का या बाबतही उत्सुकता आहे. गेल्या पाच वर्षांत मराठवाड्याला एक राज्यमंत्रिपद (अर्जून खोतकर) मिळाले पण तेही पूर्णकाळ मिळालेले नव्हते. शेवटच्या तीन महिन्यांसाठी जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत हे मराठवाड्यातील मंत्री झाले.मुंबईबाहेर शिवसेनेला मराठवाड्याने नेहमीच साथ दिली आहे. यावेळी शिवसेनेने अद्याप मराठवाड्याला संधी दिलेली नाही. गेल्यावेळी उत्तर महाराष्ट्रालाही केवळ दोन राज्यमंत्रिपदे (गुलाबराव पाटील, दादा भुसे) होती. पश्चिम महाराष्ट्रातून विजय शिवतारे हे एकमेव राज्यमंत्री होते.
Maharashtra Government: 'ते' पुन्हा येणार?; शिवसेनेत मंत्रिपदावरून जुन्या वादाची नव्याने चर्चा
By यदू जोशी | Published: November 30, 2019 4:25 AM