Maharashtra Government: आयकर विभागाच्या रडारवर शिवसेनेचे बडे नेते?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:21 AM2019-11-15T06:21:40+5:302019-11-15T06:22:27+5:30
शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या निर्णायक हालचाली सुरू असताना आयकर विभागाने मुंबई महापालिकेतील सुमारे ३७ खासगी ठेकेदारांवर छापे टाकले आहेत.
मुंबई : महायुतीतील बिघाडी आणि राज्यात सत्ता स्थापण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या निर्णायक हालचाली सुरू असताना आयकर विभागाने मुंबई महापालिकेतील सुमारे ३७ खासगी ठेकेदारांवर छापे टाकले आहेत. त्यांच्या तपासणीत कोट्यवधींचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस आले असल्याचे समजते. आता शिवसेनेचे मुंबईतील काही बडे नेते या विभागाच्या रडारवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ठेकेदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर या महापालिकेशी संबंधित नेत्यांकडे चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल उलटून चार आठवडे होत आले तरी अद्याप राज्यातील सत्तानाट्य संपलेले नाही. महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावर दावा सांगत भाजपपासून फारकत घेतल्याने या दोन्ही पक्षांत तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांपासून आयकर विभागाकडून पालिकेशी संबंधित खासगी ठेकेदारांवर छापे सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील ३७ बडे ठेकेदार, तसेच राज्यातील काही एन्ट्री आॅपरेटरची कार्यालये व निवासस्थानांची झडती घेण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७३५ कोटींच्या बनावट एन्ट्री व खर्चाच्या पावत्या मिळाल्याचे समजते. पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचा यात उल्लेख असल्याने संबंधित ठेकेदारांकडून त्याबाबत खुलासे मागण्यात आले आहेत.