मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरभाजपाकडून निशाणा साधण्यात येत आहे. तुम्ही भले वचन दिले असेल, शरदराव व सोनियांनी थोडचं वचन दिलं अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ते अवधुत वाघ यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं वचन मी बाळासाहेंबाना दिलं आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्यावर भाजपाकडून निशाणा साधण्यात आला आहे.
शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी आघाडीच्या पाठिंब्याचं पत्र हवं होतं. सोमवारी रात्री ७.३० पर्यंत शिवसेनेला यासाठी वेळ देण्यात आली होती. मात्र मुदत संपेपर्यंत दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याचं पत्र न मिळाल्याने ऐनवेळी शिवसेनेची कोंडी झाली. त्यामुळे अवधुत वाघ यांनी शिवसेना डिवचण्यासाठी ट्विट केलं. राष्ट्रवादीचं घड्याळ घालुनही वेळ पाळता आली नाही. कारण घड्याळ बिघडलेलं होतं टोला त्यांनी शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.
तसेच अवधुत वाघ गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेची आठवण करुन देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना पेपरवरही अवधुत वाघ यांनी टीका केली. यापुढे सामना हे सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक असं सांगत त्यांनी फोटो अपलोड केला.
त्याचसोबत अजित पवारांच्या विधानावर सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली होती त्याचीही आठवण वाघ यांनी करुन दिली. त्याचसोबत वाघाच्या गळ्यात पट्टा टाकून शरद पवार आणि सोनिया गांधी सत्तेचे लॉलीपॉप देत असल्याचं व्यंगचित्रही भाजपा प्रवक्ते अवधुत वाघ यांनी पोस्ट केलं आहे.
सोमवारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर बैठका झाल्या. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. याच दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी पवारांनी फोनवर चर्चा केली. तर दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पवारांनी भेट घेतली. या सर्व घडामोडीत शिवसेनेची ढाल बनून लढणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करुन पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या प्रयत्नात शिवसेना मागे हटली नाही असा विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात अद्यापही शिवसेना-महाआघाडी यांच्या सत्तास्थापनेबाबत आशा काही नेत्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.