मुंबईः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे कल जवळपास हाती आलेले आहेत. भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी शिवसेनेपेक्षा सर्वात जास्त फटका मनसेला बसल्याचं चित्र आहे. मनसेला यंदा चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु मतदारांनी मनसेच्या उमेदवारांना अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी अद्याप माध्यम प्रतिनिधींकडे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या निवडणुकीच्या निकालात राज ठाकरेंचा मनसे पक्ष कुठेच दिसत नाहीये.राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करताना राज्याला ताकदवान विरोधी पक्षाची गरज असल्याचं म्हटलं आहे. मनसेला सक्षम विरोधी पक्ष म्हणून मतदान करा, असंही आवाहन त्यांनी केलं होतं. राज्यातील या निवडणुकीत जनतेने मनसेऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधक म्हणून बळ दिले. राज्यात विधानसभा निवडणुकीत मनसेने 110 जागांवर निवडणूक लढवली असून, त्यांना फक्त कल्याण ग्रामीणमधल्या एका विधानसभा मतदारसंघात यश मिळाले आहे.विधानसभा निवडणुकीदरम्यान एक्झिट पोलमधून भाजपाला 120च्या वर जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. परंतु भाजपाला तेवढ्या अपेक्षित जागा मिळालेल्या नाहीत. उलट काँग्रेस-राष्ट्रवादीला दाखवलेल्या कमी जागांचा आकडा प्रत्यक्ष निवडणुकीत कमालीचा वाढला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून 100 जागा जिंकण्याचं जवळपास निश्चित आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : फक्त एका जागेवर विजय मिळाल्यानंतर राज ठाकरेंचे 'सूचक' मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 8:06 PM