मुंबई- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, जवळपास शिवसेना-भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. सेना-भाजपाची 220ची घोषणा हवेत विरली असून, भाजपा 105 आणि शिवसेना 56 जागांवर मर्यादित राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेनंही मुख्यमंत्रिपदासाठी भाजपावर आतापासूनच दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. सत्तेत नेहमीच मोठा भाऊ म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या शिवसेनेला मागच्या निवडणुकीत भाजपानं अक्षरशः स्वतःच्या तालावर नाचवलं होतं. मंत्रिमंडळातही शिवसेनेची दुय्यम खात्यावर बोळवण करण्यात आली होती. त्यानंतर आता शिवसेनाही भाजपावर दबावतंत्राचा वापर करत आहे.काँग्रेसनं शिवसेनेला देऊ केलेल्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाला नामोहरम करण्यासाठी शिवसेना कुरघोडी करत आहे. सोशल मीडियावरही काही व्यंगचित्र व्हायरल होत आहेत. अशाच प्रकारचं एक व्यंगचित्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टाकलं आहे. व्यंगचित्राची कमाल बुरा न मानो दिवाली आहे, असंही त्यांनी लिहिलं आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : 'वाघ' पुन्हा फॉर्मात; संजय राऊतांनी भाजपावर व्यंगचित्रातून सोडला 'बाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 2:23 PM