मुंबई: मेट्रोचा कारशेड उभारण्यासाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असताना पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी 20हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. यामुळे भाजपावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील ट्विटरच्या माध्यमातून भाजपावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवर कार्टूनचं चित्र काढत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यामध्ये आम्ही सुरक्षित जागी जाऊ शकत नाही, तरीही आमच्यावर तुम्ही कुऱ्हाडी चालवल्या आता तुमच्याही पाकळ्या गळून पडणार असं लिहून भजपाचे नेते व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील दाखवण्यात आले आहे.
चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुक लढवत आहेत. त्यामुळे कोल्हापूर सोडून पुण्यातील सुरक्षित कोथरुड मतदारसंघ निवडल्याचे बोलले जात होते. यावरुन झाडं सुरक्षित जागी जाऊ शकत नाही असं म्हणत राष्ट्रवादीने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी मैदानातील अनेक झाडे कापल्याचे समोर आल्यानंतर आता मोदींचा ताफा मैदानात येणार आहे, तिथे डांबरीकरण करण्यात आले आहे. पुण्यातील आठही जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगण्यात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.