मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाही. भाजपाने चर्चेची दारं खुली असल्याचं सांगितलं असलं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, कोणताही प्रस्ताव आला नाही अन् पाठवणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेनेत तणाव वाढल्याचं दिसून येत आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवा ही जनतेची मागणी आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जिथे जातील तिथे लोकं शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवा हेच मागणी करत आहे. शेतकरी आशेने बघत आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावर सहमती झाली होती त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितले.
तसेच कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा जाणार नाही. जे ठरलं आहे ते करा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र कोणी रचत असेल तर जनादेशाचा अनादर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अन्याय असेल असंही शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे.
दरम्यान, भाजपाने मंगळवारी कोअर कमिटीची बैठक घेतली या बैठकीनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे.
तसेच भाजपाकडून प्लॅन बीदेखील तयार करण्यात येत आहे. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले आहेत तर काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने ही संख्या ११८ पर्यंत पोहचली आहे. जर शिवसेनासोबत आली नाही तरी भाजपा बहुमत सिद्ध करु शकते असा दावा भाजपाच्या एका मंत्र्याने केला आहे. तसेच शिवसेना आघाडीच्या पाठिंब्याने सरकार बनवेल हा अंदाज या ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळून लावला आहे.