आमदार झाले घासून आणि ठासून! मुंबईतील लढती ठरल्या रंगतदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 03:05 PM2024-11-25T15:05:30+5:302024-11-25T15:08:07+5:30
विधानसभेची यंदाची निवडणूक मुंबईत अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या या निवडणुकीला अनेक कंगोरे होते.
सुरेश ठमके
मुंबई :
विधानसभेची यंदाची निवडणूक मुंबईत अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या या निवडणुकीला अनेक कंगोरे होते. त्यामुळे काही उमेदवार घासून येणार की ठासून? याबाबत चर्चा सुरू होती. अनेक दिग्गज उमेदवार ठासून येण्याची भाषा करत असताना अत्यंत कमी मताधिक्याने अर्थात घासून आल्याचे चित्र पाहायला मिळाले; तर काही उमेदवारांना अनपेक्षितपणे प्रतिस्पर्धी उमेदवारावर मोठ्या मताधिक्याने विजय अर्थात ठासून विजय मिळवता आला.
मुंबई आणि उपनगरांतील अनेक मतदारसंघांमध्ये उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अथवा भाजप विरुद्ध उद्धवसेना आणि काही मतदारसंघांत काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळाली. मुंबईत अजूनही काही मतदारसंघांवर प्रभाव असलेल्या मनसेच्या उमेदवारांमुळे तिरंगी लढतही झाली. या तिरंगी लढतीमुळे ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे, तेथे अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. ज्यामध्ये काही उमेदवारांना अत्यंत कमी मताधिक्याने निसटता विजय मिळवता आला. ज्या मतदारसंघांमध्ये मनसे फारशी प्रभावी नव्हती, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने मते मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी ‘वंचित’ला अत्यंत कमी मते मिळाली. त्यामुळे अशा मतदारसंघांमध्ये झालेल्या थेट लढतीत काही उमेदवारांनी ५० हजार ते ९० हजारांपर्यंतचे मताधिक्य मिळवत ते जायंट किलर ठरले.
पश्चिम उपनगरांतील बोरिवली आणि चारकोप या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपच्या उमेदवारांनी मिळवले तर दक्षिण मुंबईतील माहीम आणि जोगेश्वरी मतदारसंघात उद्धवसेनेच्या उमेदवारांना विजयासाठी झुंजावे लागले. ३६ मतदारसंघांमध्ये दहा हजारांपेक्षा कमी मताधिक्य मिळवलेल्या मतदारसंघांमध्ये १० मतदारसंघांचा समावेश आहे; तर ३५ हजार ते ९० हजारांपर्यंतच्या मताधिक्यामध्ये १० मतदारसंघांचा समावेश आहे.
कमी मतांनी विजय
माहीम :
महेश सावंत (उद्धवसेना) ५०,२१३
सदा सरवणकर (शिंदेसेना) ४८,८९७
१,३१६ मतांनी विजय
जोगेश्वरी पूर्व :
अनंत नर (उद्धवसेना) ७७,०४४
मनीषा वायकर (शिंदेसेना) ७५,५०३
१,५४१ मतांनी विजय
वर्सोवा :
हारुण खान (उद्धवसेना) ६५,३९६
डॉ. भारती लव्हेकर (भाजप) ६३,७९६
१,६०० मतांनी विजय
अणुशक्तीनगर :
सना मलिक (अजित पवार गट) ४९,३४१
फआद अहमद (शरद पवार गट) ४५,९६३
३,३७८ मतांनी विजय
५ ते १० हजार मताधिक्य
सायन कोळीवाडा :
कॅ. आर. तमिळ सेल्वन (भाजप) ७३,४२९
गणेशकुमार यादव (काँग्रेस) ६५५३४
७,८९५ मतांनी विजय
वरळी :
आदित्य ठाकरे (उद्धवसेना) ६३,३२४
मिलिंद देवरा (शिंदेसेना) ५४,५२३
८,८०१ मतांनी विजय
भांडुप पश्चिम :
अशोक पाटील (शिंदेसेना) ७७,७५४
रमेश कोरगावकर (उद्धवसेना) ७०,९९०
६,७६४ मतांनी विजय
शिवडी :
अजय चौधरी (उद्धवसेना) ७४,८९०
बाळा नांदगावकर (मनसे) ६७,७५०
७,१४० मतांनी विजय
५० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य
बोरीवली :
संजय उपाध्याय
(भाजप) १,३९,९४७
संजय भोसले
(उद्धवसेना) ३९,६९०
१,००,२५७ मतांनी विजय
मुलुंड :
मिहीर कोटेचा
(भाजप) १,३१,५४९
राकेश शेट्टी ४१,५१७
९०,०३२ मतांनी विजय
कांदिवली पूर्व :
अतुल भातखळकर
भाजप १,१४,२०३
कालू बुधेलिया
काँग्रेस ३०,६१०
८३,५९३ मतांनी विजय