मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बुधवारपासून (18 ऑक्टोबर )त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात कर्जमाफी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 'आपले सरकार' या वेबसाईटवरील लाभार्थ्यांच्या नावांच्या यादीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पडला. यावेळी काही शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्रही देण्यात आले.
दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी करण्यात आली. सुरुवातीला 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पाहिल्या टप्प्यात लाभ मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. दररोज 2 ते 5 लाख खाती निकाली काढण्यात येणार आहेत. शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना सुरूच राहणार असल्याचं, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.