उपमुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा अखेरच्या क्षणी होकार; राजभवानाला दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:13 IST2024-12-05T16:05:20+5:302024-12-05T16:13:50+5:30
एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.

उपमुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा अखेरच्या क्षणी होकार; राजभवानाला दिली माहिती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यास होकार दिला आहे. मोठ्या सस्पेंसनंतर त्यांनी शपथविधीच्या सुमारे दोन तास आधी उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यासाठी होकार दिला. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यासाठी राजी झाल्याची माहिती शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली आहे. आज संध्याकाळी आझाद मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात शपथही घेणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे हे अखेर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राजभवनात सरकारकडून शपथ घेणाऱ्यांची नावं पाठवण्यात आली आहेत. त्या पत्रात उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे देखील नाव आहे. दुसरीकडे, उदय सामंत यांनी आपणही पत्र घेऊन राजभवनावर जात असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर उदय सामंत यांनी राजभवनाच्या सचिवांकडे त्यांनी ते पत्र सूपूर्द केलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे आज उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा तोडगा निघाल्यानंतर उदय सामंत, भरत गोगावले, राहुल शेवाळे, रविंद्र फाटक यांनी अखेरच्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेनेच्या नेत्यांना पत्र देण्यात आलं. ते पत्र उदय सामंत यांनी राजभवनाच्या सचिवांकडे सूपूर्द केलं. सकाळपासून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की नाही असा दुपारी ३ वाजेपर्यंत कायम होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदेही शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं. आझाद मैदानात संध्याकाळी ५:३० वाजता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालय मिळावे आणि त्यांच्या पक्षाला विधानसभा अध्यक्षपदही मिळावे, अशी त्यांची मागणी असल्याने ते उपमुख्यमंत्रीपद घेत नसल्याचे बोलले जात होतं. मात्र शिवसेना आमदारांच्या समजूतीनंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी होकार दिला.