मुंबईतील मानखुर्द येथील मंडालामधील भंगार गोदामाला शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दालाला अद्याप यश आलेलं नाही. त्यावरुनच ही आग किती भयानक स्वरुपाची असल्याची कल्पना येते. (Massive fire breaks out at Mankhurd scrapyard)
भंगार गोदामाला लागलेल्या आगीचा आज सकाळचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आगीचे लोट अजूनही कायम असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तर सर्वत्र धुराचं साम्राज्य परसलं आहे. त्यामुळे वायूप्रदुषणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुर्घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोठ्या झोपडपट्टीतूनही आगीच्या ज्वाला दिसत आहेत. आसपासच्या परिसरात आगीचा धूर पसरल्याने बहुतांशी परिसर काळोखात गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबई अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. यासाठी १५ फायर इंजिन घटनास्थळावर दाखल आहेत. याशिवाय अनेक पाण्याचे टँकर, ११ जेटी आणि रुग्णवाहिका देखील उपस्थित आहेत. पण या ठिकाणी एकमेकांना खेटून मोठ्या प्रमाणात भंगाराची गोदामं असल्यानं आग झपाट्यानं पसरत आहे. कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी परिसरात मोठया प्रमाणावर भंगारची गोदामे आहेत. शिवाय लगतच डम्पिंग ग्राऊंडदेखील आहे. यापूर्वी डम्पिंग ग्राऊंडला मोठया प्रमाणावर आगी लागल्या असून, भंगारच्या गोदामांनादेखील मोठया आगी लागल्या आहेत.