मुंबई- कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी बंद पाडले आहे. येथील मच्छिमारांच्या आंदोलनाला महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने पाठिंबा दिला आहे. समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला ही माहिती दिली. यावेळी मोरेश्वर कोळी, संदेश केणी उपस्थित होते.
समितीने काल वरळी कोळीवाड्याच्या कोस्टल रोड प्रकल्प बाधित पारंपारिक मच्छिमारांची भेट घेऊन कोस्टल रोड प्रकल्पा विरोधात आंदोलनाला महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचा पाठिंबा होता, आजही आहे व पुढेही कायम राहील आणि वेळ पडली तर आक्रमक आंदोलन करण्यात येईल असे आश्वासन देत त्यांना दिलासा दिला.
वरळी कोळीवाडा नाखवा मत्स्यव्यवसायिक सहकारी संस्थेचे सचिव नितेश पाटील,वरळी सर्वोदय मच्छिमार सहकारी सोसायटीचे राॅयल पाटील व पारंपारिक मच्छिमारांनी सुरू केलेल्या आंदोलनात समिती सहभागी झाली. तसेच वरळी कोळीवाडा येथे लवकरच मुंबईतील कोळी/ मच्छिमार समाजाची जनजागृती साठी बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन कोळी यांनी दिले.
मासेमारी बांधवांचा पिक हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधव आपली उपजीविका वाचविण्यासाठी मासेमारी बंद करुन कोस्टल रोड प्रकल्प काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने समुद्रातील कामाला मुभा दिली नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका व राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाची व पारंपारिक मच्छिमारांची फसवणूक करून तसेच संबंधित कार्यालयाने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्राचा दुरुपयोग करून पोलिस बळाचा वापर करून हुकूमशाही पद्धतीने प्रकल्प रेटून नेत आहेत. तेव्हा मच्छिमार सहकारी संस्था पदाधिकारी, नाखवा मंडळीने आपल्या मासेमारी नौका आंदोलनात सहभागी होण्यासाठी सज्ज ठेवा असे आवाहन किरण कोळी यांनी केले.