Join us

Maharashtra Flood: पूरग्रस्तांना मिळणारी मदत अपुरी; काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:27 PM

पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. पशुधन नष्ट झाले आहे.

मुंबई - राज्यातील पूरग्रस्तांना मिळणारी मदत तोकडी असल्याची सांगत पूरग्रस्त भागाचं नुकसान 15 हजार कोटींच्यावर आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत चर्चा केली. 

या भेटीनंतर बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली की, पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. पशुधन नष्ट झाले आहे. लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६० हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाजार भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी. पडझड झालेली घरे सरकारने बांधून द्यावीत या व इतर मागण्यांचे निवेदन काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिले. यावेळी थोरातांनी सांगितले की, राज्य आणि केंद्र सरकारने राज्यातल्या पूरस्थितीकडे गांभीर्याने पाहिले नाही म्हणून परिस्थिती वाईट झाली. केंद्र सरकारने अद्याप राज्यातील पूराला एल 3 आपत्ती म्हणून जाहीर केले नाही, त्यामुळे अद्याप केंद्राने राज्याला मदत दिली नाही असा आरोप त्यांनी केला.  

या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत,आ. बसवराज पाटील, माजी मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले, आ. विरेंद्र जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते.

दरम्यान मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागात मदतीसाठी केंद्र सरकारने ६ हजार ८१३ कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे. या पॅकेजच्या मसुद्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली. केंद्राकडून मदत येण्याची प्रतीक्षा न करता, राज्य शासनाने स्वत:च्या तिजोरीतून हा निधी देणे सुरू केले आहे, असे तातडीने घेता यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. आठवड्यातून किमान एकदा या उपसमितीची बैठक होईल.केंद्राची मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :कोल्हापूर पूरसांगली पूरसातारा पूरआ. बाळासाहेब थोरातकाँग्रेसदेवेंद्र फडणवीस