मुंबई - रायगड, रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळी महाड येथील दुर्घटनास्थळाला भेट देत नागरिकांना धीर दिला, अनेकांचं सांत्वन केलं. तसेच, येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची असून त्यासाठी आराखडा आखण्यात येईल, असेही स्पष्ट केले. तर, दुसरीकडे प. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातही पूराने थैमान घातले आहे.
पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू लपून राहत नाहीत, बेघर झालेल्यांचा, आप्तेष्ट गमावलेल्यांचा टाहो पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. आत्तापर्यंत राज्यातील पूरदुर्घटनेत तब्बल 112 जणांनी आपली जीव गमावला असून 53 जण जखमी झाले आहेत. तर, एनडीआरएफ जवान आणि भारतीय सैन्याच्या जवानांनी तब्बल 1.35 हजार नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. आत्तापर्यंत सरकारी आकडेवाडीनुसार या दुर्घटनेत 3221 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर, अद्यापही 99 माणसं बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
तुकाराम मुंढे नि:शब्द
पूरग्रस्त भागातील हे विदारक चित्र पाहून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनीही ट्विट करुन, हे दु:ख शब्दापलीकडचे असल्याचं म्हटलं. तसेच, महाराष्ट्र राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील महाप्रकोपामधील मृत्युतांडव, अश्रूतांडव हे शब्दापलीकडचे आहे. नि:शब्द…. भावपूर्ण प्रार्थना… असे भावूक, हतबल ट्विट मुंढे यांनी केले आहे.
भरत जाधवने केलं मदतीचं आवाहन
कोकणात सध्या संसार उद्धवस्त झालेल्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यांना आज वस्तू आणि अन्नधान्याची गरज आहे. त्यामुळेच, मराठमोळा अभिनेता आणि कोकणचा पुत्र भरत जाधव पुढे सरसावला आहे. भरत जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये 'युथ फॉर डेमॉक्रसी', असे तरुणाईला आणि नेटीझन्सला कोकणाच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय. आपल्या कोकणाला देऊया मदतीचा हात, जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ (सुका मेवा, फरसाण, वेफर्स, बिस्कीट, खजूर). कुटुंबातील महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, जीवनावश्यक वस्तू, अंथरून-पांघरुण देण्यासाठी भरत जाधवने मदतीची हाक दिली आहे.