मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत आहेत. शनिवारी महाड येथील तळये गावाला भेट दिल्यानंतर रविवारी मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला भेट दिली. तेथील व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, तसेच मदतीचे आश्वासनही दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा किंवा पॅकेज या पूरग्रस्त भागासाठा जाहीर केलं नाही. त्यावरुन भाजपने मुख्यमंत्र्यांचा दौरा काहीही उपयोगाचा नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री दौऱ्यावर जाऊन ना काही घोषणा करत आहेत, ना पीडितांना मदत करत आहेत. केवळ सरकारी यंत्रणांवर ताण वाढवत आहेत. त्यामुळे, ते घरी बसून पाहात होते तेच बरं होतं, असं म्हणायची वेळ आलीय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबतचे आमदार उर्मट भाषेचा वापर करुन नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर टीका केली आहे.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२६ जुलै) रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले होते. मात्र, सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयनानगरातील हेलिपॅडवर ते लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी फिरावं लागलं.
भास्कर जाधवांविरुद्ध महिलांचा आक्रोश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान एका महिलेने आमदांराचा २ महिन्याचा पगार फिरवा आणि आम्हाला नुकसान भरपाई द्या. अशी मागणी केली होती. ''आमदार 5 महिन्यांचा पगार देतील पण त्याने काहीही होणार नाही, बाकी काय, तुमचा मुलगा कुठयं, अरे आईला समजव, उद्या ये'' असे अरेरावीच्या भाषेतले उत्तर ठाकरे यांच्याबरोबर उपस्थित असणाऱ्या आमदार भास्कर जाधव यांनी दिले होते. जाधव यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वातवरण ढवळून निघाले आहे. तसेच त्यांच्यावर सर्व माध्यमातून टीकाही होऊ लागली आहे. त्याचे पडसाद राज्यात सर्व ठिकाणी उमटू लागले आहे. पुण्यातही त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.
भास्कर जाधव यांचे वर्तन योग्य नाही - फडणवीस
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आला आहे. यामुळे जनतेचा आक्रोश पाहायला मिळतो. मात्र, त्यासाठी अंगावर जाणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी केलेले वर्तन योग्य नाही. या घटनेची दखल घेतली गेली पाहिजे. वर्षभरातील तीन मोठ्या घटनेमुळे कोकणवासीय उद्ध्वस्त झाले आहेत. यासाठी आता आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला हवा. कोल्हापूर आणि सांगलीतील महापुरावेळी जीआर बदलून मदत केली होती. तशीच मदत आता करायला हवी, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.