Maharashtra Flood: 'तेव्हा पंतप्रधानांना १० दिवस येऊ नका सांगितलेलं'; शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:58 PM2021-07-27T12:58:33+5:302021-07-27T12:59:37+5:30
Maharashtra Flood, Sharad Pawar: नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे टाळावेत असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे
Maharashtra Flood, Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यातील पूरग्रस्त भागांना पक्षाकडून मदत जाहीर केली. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून मदत केली जाणार असून २५० डॉक्टरांचं पथक देखील पूरग्रस्त भागात पाठवणार असल्याचं पवारांनी सांगितलं. त्यांनी यावेळी राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागांचे दौरे टाळण्याचं आवाहन केलं. (Maharashtra Flood Sharad Pawar appeal to leaders not to visit flood affected areas in state)
पूरग्रस्तांना १६ हजार किट, २५० डॉक्टरांचा पथक; राष्ट्रवादीकडून मदत जाहीर
"माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषत: लातूरच्या वेळचा अनुभव आहे. अशा घटनांनंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यक्त आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, त्यामुळे नेत्यांनी दौरे टाळावेत", असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी लातूर भूकंपावेळीचा अनुभव कथन केला. "मी लातूरला असताना आम्ही सगळे जण कामात होतो. पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस तरी इथं येऊ नका. तुम्ही आलात तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे की त्यांनी माझी विनंती मान्य केली होती आणि ते दहा दिवसांनंतर आले. कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही", असं शरद पवार म्हणाले.
राज्यपालांच्या दौऱ्यावर केलं विधान
"दौरे होत आहेत त्यानं धीर मिळतो. पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळे दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळे यंत्रणेला त्रास होतो. ठिक आहे राज्यपाल जात आहेत त्यांचे केंद्राचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते जास्त मदत आणू शकतात. केंद्रातून मदत मिळवून देण्यासाठी राज्यपालांचा उपयोग व्हावा", असं शरद पवार म्हणाले.
पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं वाटप
पूरग्रस्त भागातील कुटुंबांना औषधं, लहान मुलांसाठी बिस्कीटं, भांडी, मास्क व इतर महत्वाच्या वस्तू असं १६ हजार किट्सचं वाटप केलं जाणार आहे. यासोबत पूरग्रस्त भागांमध्ये २५० डॉक्टरांचं पथक वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पाठविण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. या सर्व साहित्याची किंमत अडीच कोटी इतकी असल्याचीही माहिती त्यांनी दिली.