महाराष्ट्र गारठतोय : गोंदिया ७.४ तर मुंबई २० अंश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 06:46 PM2020-12-20T18:46:45+5:302020-12-20T18:47:01+5:30
Maharashtra is freezing : शीत लहरीमुळे उत्तरेकडील राज्यात हाडे गोठविणारी थंडी
मुंबई : शीत लहरीमुळे उत्तरेकडील राज्यात हाडे गोठविणारी थंडी पडली असतानाच आता महाराष्ट्रदेखील चांगलाच गारठू लागला आहे. रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात घसरलेल्या किमान तापमानामुळे येथील जिल्हे चांगलेच गारठले आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २१ ते २४ डिसेंबर या कालावधी गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. परिणामी किमान तापमनाचा पारा आणखी खाली येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषत: विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मुंबईत रविवारी किमान तापमानाची नोंद २०.२ अंश सेल्सिअस एवढी झाली आहे. सोमवारपासून मुंबईसह लगतच्या परिसरात किमान तापमानात आणखी घट नोंदविण्यात येईल. तर् मुंबईत सोमवारी आणि मंगळवारी आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
-------------
शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये.
गोंदिया ७.४
नागपूर ८.६
वर्धा १०.२
परभणी १०.६
जळगाव १२
महाबळेश्वर १२.१
नाशिक १२.२
पुणे १२.२
औरंगाबाद १२.४
अकोला १२.६
चंद्रपूर १२.६
अमरावती १२.७
मालेगाव १३.२
नांदेड १३.५
बुलढाणा १३.८
वाशिम १३.८
सातारा १४.८
सोलापूर १५.५
सांगली १६.५
कोल्हापूर १७.१
मुंबई २०.२