Join us

अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तानमार्गे येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला

By सचिन लुंगसे | Published: May 22, 2024 7:24 PM

वाढत्या ऊकाड्याने मुंबईकरांना आरोग्याचा त्रास जाणवू लागला आहे.

मुंबई : अफगाणिस्तान आणि दक्षिण पाकिस्तान मार्गे पश्चिमेकडून गुजरातच्या दिशेने ताशी ३५ ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील कोकण आणि उर्वरित भागात बऱ्यापैकी उष्णता वाढली असून, याचा त्रास पुढील आणखी काही दिवस होईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. विशेषत: मुंबईत २४ तास उष्ण आणि दमट वातावरण असून, वाढत्या ऊकाड्याने मुंबईकरांना आरोग्याचा त्रास जाणवू लागला आहे.

समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीच्या हवेच्या जाडीत अफगाणिस्तान, दक्षिण पाकिस्तान मार्गे पश्चिमेकडून ताशी ३५ ते ४० किमी येणारे उष्ण वारे संपूर्ण गुजरात राज्यावर आदळतात. पश्चिम, तसेच मध्य महाराष्ट्रावरील दक्षिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाब पट्ट्यामुळे हे उष्ण वारे जळगाव, धुळे जिल्ह्यातून दिशा बदलून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे. त्यामुळे संपूर्ण गुजरात राज्य, मुंबईसह कोकण किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. शिवाय यातील काही वारे अरबी समुद्रातून भुभागावर वाहत असल्यामुळे ते प्रचंड आर्द्रता भूभागावर घेऊन येत आहे. आधीच उष्ण वारे त्यात आर्द्रतेची भर पडल्यामुळे दमटयुक्त उष्णता जाणवत आहे. ही उष्णता वाढण्याची कारणे आहेत, असे  हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. विजेची मागणी कायममुंबईत मंगळवारी विजेची मागणी ४ हजार २६७ मेगावॉट नोंदविण्यात आली. टाटा पॉवरकडून १ हजार ३१ मेगावॉट तर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून २ हजार २४० मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला.

काय आहे अंदाज१) मुंबई शहर आणि उपनगरात सकाळी आकाश ढगाळ राहील. दुपारी आणि सायंकाळी आकाश निरभ्र राहील. शहर आणि उपनगरात दमट आणि उष्ण परिस्थिती राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३५, २९ अंशाच्या आसपास राहील. कुठे पडेल पाऊस१) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्हयांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल.२) दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्हयांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल. कुठे उष्णतेची लाट१) उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भातील जिल्हयांत तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.२) उत्तर कोकणातील जिल्हयांत तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहील. 

टॅग्स :मुंबई