Join us

महाराष्ट्र गुंतवणुकीत पडला पिछाडीवर! काँग्रेसचा दावा; केंद्र सरकारच्या आकडेवारीचा दाखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:17 AM

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु भाजपा-शिवसेनेच्या काळात गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई : काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु भाजपा-शिवसेनेच्या काळात गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या ‘डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अ‍ॅण्ड प्रमोशन’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१५ मध्ये गुजरातेत ६३ हजार ८२३ कोटी, छत्तीसगढमध्ये ३६ हजार ५११ कोटी, कर्नाटकात ३१ हजार ५४४ कोटी तर महाराष्ट्रात ३२ हजार ९१९ कोटी रूपयांची गुंतवणूक प्रस्तावित होती. २०१६ मध्ये कर्नाटकमध्ये १ लाख ५४ हजार १३१ कोटी, गुजरातेत ५३ हजार ६२१ कोटी तर महाराष्ट्रात ३८ हजार ०८४ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले, असे ते म्हणाले.२०१७ च्या जानेवारी ते सप्टेंबरमध्ये कर्नाटकात १ लाख ४७ हजार ६२५ कोटी, गुजरातमध्ये ६५ हजार ७४१ कोटी तर महाराष्ट्रात २५ हजार १८ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. यंदाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गुजरातच्या तुलनेत जेमतेम एक तृतियांश गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. पूर्वी गुजरात महाराष्ट्रापेक्षा किती तरी पिछाडीवर असायचा. परंतु, विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणाचा गुजरात लाभार्थी असल्याचे दिसून येत असल्याची टीका सावंत यांनी केली.केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २००० ते २०१२ मध्ये महाराष्ट्रात एकूण ६१.१३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती व देशाच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल ३३ टक्के होते.महाराष्ट्रात २०१०-११ मध्ये २७,६६९ कोटी, २०११-१२ मध्ये ४४,६६४ कोटी व २०१२-१३ मध्ये ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या काळात देशभरातील एकूण गुंतवणुकीपैकी गुजरातचा वाटा केवळ ५ टक्के होता. त्यावरून महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना सरकार आल्यानंतर गुंतवणुकीत मोठी पिछेहाट झाल्याचे स्पष्ट होते, असे सावंत म्हणाले.उद्योग क्षेत्राची अधोगतीकेंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी या सरकारचा खोटेपणा उघड पाडणारी असून या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्र पिछाडीवर गेला आहे, हे अधोरेखित करणारी आहे. देशातील गुंतवणुकीच्या तुलनेत २०१५ मध्ये महाराष्ट्रात १०.७ टक्के, २०१६ मध्ये ९.२८ टक्के तर सप्टेंबर २०१७ पर्यंत ७.५३ टक्केच गुंतवणूक आली आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राची अधोगती सांगण्यास पुरेशी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईकाँग्रेस