मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना वादग्रस्त विधान केल्याने शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे. नारायण राणेंच्या विधानावरुन राज्यात गोंधळ निर्माण झाल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर, राणेंनी अटक करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरा नारायण राणेंना जामिन मंजूर झाला. त्यानंतर, राणेसमर्थकांनी जल्लोष केला. मात्र, दिवसभरातील राड्यामुळे, मारहाणीच्या महाराष्ट्राला काय फायदा झाला, हे मनसेनं सांगितलं आहे.
मंगळवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. अनेक ठिकाणी मोठ्या गर्दीत आंदोलने होत होती. कोरोनाचे बंधन असतानाही, नियमांना धाब्यावर बसवून राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्यावरुन, मनसेनं मुख्यमंत्र्यांना टोलाही लगावला होता. त्यानंतर, आज पुन्हा एकदा आंदोलक, दोन्ही गटाचे समर्थक आणि सरकारवर मनसेनं निशाणा साधला आहे. मनसेचं नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन कालच्या राड्यामुळे महाराष्ट्राला काय फायदा झाला हे उपरोधात्मक टिकेतून सांगितलंय.
कालच्या भानगडी मुळे महाराष्ट्राला झालेले फायदे1) डेल्टा, डेल्टा प्लस अस काही नसतं2) घरचंच आंदोलन होतं, त्यामुळे आपल्यावर खापर फुटू नये म्हणून तिसऱ्या लाटेला सुट्टी3) सोशल डिस्टनसिंगचा फज्जा पत्रकार विसरले4) आता आपण करोनाच्या "कानात"आत्मविश्वासाने सांगू शकतो तू संपलास. असे 4 फायदे महाराष्ट्राला झाल्याचे सांगत कोरोनावरील निर्बंधामुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे. दरम्यान, मंगळवारीही संदीप देशपांडे यांनी कोरोनाचा विसर पडला का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावेळीही, नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
काय म्हणाले होते देशपांडे
महाराष्ट्रात आज सकाळपासून कायदा सुव्यवस्था "फाट्यावर" मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टनसिंग नाही, गर्दीच गर्दी असून "करोना हृदय सम्राट" गप्प का? आणि हो सोशल डिस्टनसिंगचा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
राणेंच्या विधानवरुन शिवसेना आक्रमक
रायगड येथील महाडमध्ये राणेंची जन आशिर्वाद यात्रा पोहोचली त्यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना राणेंनी मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून नारायण राणेंविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.