मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री बनली आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेत पण त्यांना आघाडीचं सरकार चालविण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागणार असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून खातेवाटपात रस्सीखेच सुरु असल्याने अद्यापही या तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटपावर एकमत झालं नाही.
काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, तिन्ही पक्ष गृह, शहर विकास, महसूल, गृहनिर्माण या पदावर दावा केला आहे. शरद पवार यात मध्यस्थी करतील अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. वेळेवर या आघाडीतील मतभेद दूर झाल्यास नवीन सरकार चांगल्या कामांना सुरुवात करेल. बुधवारी झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षपद घेण्यास नकार दिल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि एक अतिरिक्त मंत्रिपद यासाठी काँग्रेसने आग्रह केला आहे.
पृथ्वीराज चव्हाणांनीही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना कळविले आहे की, त्यांना विधानसभा अध्यक्षपद नकोय, मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीने हे पद स्वीकारु नये, प्रोटोकॉलनुसार या पदाची उंची मुख्यंमंत्र्यांपेक्षा कमी असते. त्यामुळे हे पद स्वीकार करण्यास चव्हाणांनी नकार दिला आहे. कारण त्यांच्या राजकीय वाटचालीवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती पृथ्वीराज चव्हाणांना वाटते.
पृथ्वीराज चव्हाणांसोबतच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही अद्यापही कोणतंही खातेवाटप मिळालं नसल्याने ते नाराज आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांना कॅबिनेटपद मिळावं अशी मागणी काँग्रेस नेत्यांची आहे. उद्धव ठाकरे सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी या दोन्ही दिग्गज नेत्यांना सामावून घेतलं जाईल असं काँग्रेस नेते सांगत आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अद्यापही महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चा करत आहेत. गांधी कुटुंबाकडून उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला कोणीही हजर राहिलं नसलं तरी सर्वांनी पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळा शिवाजी पार्क येथे पार पडला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह शिवसेनेच्या राज्यातील सर्व नेत्यांबरोबर प्रथमच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, के. सी. वेणुगोपाल, कपिल सिब्बल, अभिषेक मनू संघवी, अविनाश पांडे, राजीव शुक्ला, डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन व खासदार टी.आर. बालू, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी अशा महाविकास आघाडीच्या नेत्यांची मांदियाळी व्यासपीठावर होती.