Maharashtra Government: 'वर्षा'वरील फडणवीसांचा मुक्काम संपला; सामानाची आवराआवर, घर सोडण्याची लगबग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:13 AM2019-11-29T10:13:54+5:302019-11-29T11:57:16+5:30
गुरुवारी एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधीचा भव्य सोहळा शिवाजी पार्कवर पार पडत असताना दुसरीकडे मात्र वर्षा बंगल्यावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची घर सोडण्याची तयारी सुरु होती.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी बाजी मारत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना प्रथापरंपरेनुसार मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडावा लागणार आहे. त्यामुळे फडणवीस दाम्पत्यांनी घरातील सामानाची आवराआवर करण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी एकीकडे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांचा शपथविधीचा भव्य सोहळा शिवाजी पार्कवर पार पडत असताना दुसरीकडे मात्र वर्षा बंगल्यावर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची घर सोडण्याची तयारी सुरु होती. फडणवीसांचे घरगुती सामाना घेऊन जाण्यासाठी टेम्पो आला होता. त्याचसोबत घरातील साहित्यांची पॅकिंग करण्यासाठी १२ कामगारही होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभा बरखास्त होईपर्यंत राज्यात कोणतंही सरकार आलं नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कारभार पाहत होते.
Mumbai: Former #Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis has started the process of vacating the official CM residence 'Varsha'. (file pic) pic.twitter.com/kttW45OpKB
— ANI (@ANI) November 29, 2019
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्र्यांनाही आपले बंगले सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्याचसोबत मंत्रालयातील मंत्र्यांची कार्यालयेही रिक्त करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु झाल्याने प्रशासनाने तातडीने कार्यालय ताब्यात घेतली. बंगले रिकामे केले. मात्र वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांना मुक्काम कायम होता. याच दरम्यान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली हे संपूर्ण प्रकरण कोर्टात गेले. पण अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार ४ दिवसांत कोसळलं. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरच मुक्काम करत होते.
मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने देवेंद्र फडणवीस दाम्पत्यांना वर्षा बंगला तातडीने रिक्त करावा लागणार आहे. फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची धुरा येणार असल्याने त्यांना विरोधी पक्षनेत्याचा बंगला दिला जाईल. मात्र तो बंगला मिळेपर्यंत त्यांना फडणवीसांना दुसरीकडे घरं शोधावं लागणार आहे.
दरम्यान, धर्मनिरपेक्षता हेच महाविकास आघाडी सरकारचे मुख्य सूत्र असणार आहे. आघाडी सरकारचा प्रत्येक निर्णय भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकातील मुल्यांना अनुसरून असेल. भाषा, जात, धर्म आदी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आम्ही महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ, असे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.