Maharashtra Government: भाजपाच्या ऑपरेशन लोटसला भेदणारी हीच 'ती' राष्ट्रवादीची लेडी डॉन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 08:31 AM2019-11-29T08:31:16+5:302019-11-29T11:15:21+5:30
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २२ नोव्हेंबरच्या रातोरात भाजपाशी हातमिळवणी करत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाला महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याने सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गेल्या महिनाभरापासून सत्तेची रस्सीखेच भाजपा आणि इतर तीन पक्षांमध्ये सुरु होती. मात्र या स्पर्धेत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बेपत्ता प्रकरणाचं थरार नाट्य घडलं त्यामुळे अनेकांना धक्का बसला.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २२ नोव्हेंबरच्या रातोरात भाजपाशी हातमिळवणी करत थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे १०-११ आमदार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे समर्थक आमदार फुटल्याची चर्चा सुरु झाली. यामध्ये राष्ट्रवादीचे काही आमदार बेपत्ता असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मात्र काही दिवसांनंतर हे आमदार परतले, घडलेला प्रसंग त्यांनी माध्यमांना सांगितला. पण या सर्व घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील दोन युवा शिलेदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रवादीच्या बेपत्ता आमदारांपैकी एकाने शरद पवारांना संदेश पाठवून आम्हाला दिल्ली गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिली. यानंतर तातडीने हा संदेश राष्ट्रवादी युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा आणि विद्यार्थी अध्यक्षा सोनिया दुहन यांना देण्यात आला. त्यानंतर सुरु झालं या आमदारांचे सर्च ऑपरेशन, धीरज शर्मा हे मुळचे ग्रुरुग्रामचे तर सोनिया दुहन या हरियाणा राज्यातील आहेत. या दोघांनाही ही माहिती मिळाल्यानंतर काही विश्वासू शिलेदारांकडून यांनी आमदारांना कोणत्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे याची माहिती मिळविली. त्यानंतर गुरुग्रामच्या हॉटेल ओबेरॉयमध्ये ५ व्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये यांना ठेवण्यात आल्याचं कळलं.
धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांनी काही विश्वासू लोकांकडून माहिती जमा करुन त्या हॉटेलमध्ये पोहचले त्यावेळी जवळपास १५० लोकं आणि त्यात भाजपाचे जिल्हाध्यक्ष भूपेंद्र चौहान असल्याचं सोनिया यांनी सांगितले. यावेळी धीरज आणि सोनिया यांनी सावधरित्या २ टीम बनवित प्लॅन ए आणि प्लॅन बी आखला. काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना या हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगितले. राष्ट्रवादीचे जवळपास २०-२५ कार्यकर्ते हॉटेलमध्ये वास्तव्य करत होते. त्यात हॉटेलमधील काही विश्वासू खबऱ्यांकडून सोनिया आणि धीरज माहिती गोळा करत होते. १५० लोकांच्या गराड्यातून राष्ट्रवादीच्या ४ आमदारांना बाहेर काढणं आव्हानात्मक होतं. स्थानिक पोलीस अधिकारी आणि १५० लोकांच्या नजरेतून वाचत या दोघांनी आमदारांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. रात्रीच्या ९.३० च्या सुमारास भाजपा कार्यकर्ते जेवण करण्यास गेले, या हालचालीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या आमदारांना हॉटेलच्या मागच्या दरवाजाने बाहेर काढलं. हॉटेल परिसराच्या भोवती सोनिया दुहन यांनी सांगितल्याप्रमाणे ८ गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या होत्या. या आमदारांना बाहेर काढून एका गाडीत बसवून जाताना भाजपा कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर या आमदारांना एका गाडीतून दुसऱ्या गाडीत हलविण्यात आलं. तिथून या सर्वांना शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आलं. रात्री पवारांच्या घरी जेवण केल्यानंतर सोनिया दुहन आणि धीरज शर्मा यांच्या देखरेखीत या सर्व आमदारांना मुंबईत आणलं गेलं.
या घडामोडीत हॉटेलमध्ये काही भाजपा कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी झटापटही झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र शरद पवारांसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत, असं सोनिया दुहन यांनी सांगितले. या आमदारांना सुखरुप आणल्याबद्दल शरद पवारांनी धीरज शर्मा आणि सोनिया दुहन यांना शाबासकी थाप दिली.