Join us

Maharashtra Government: अशी 'ही' लपवा-छपवी आणि भीती का?; पहिल्याच कॅबिनेट बैठकीवर फडणवीसांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:39 AM

सत्ता गमावल्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीची घरोबा करत सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात सर्वाधिक जास्त जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. 

सत्ता गमावल्यामुळे भाजपाने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा पार पडताच दुसऱ्या क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी किमान समान कार्यक्रमावर टीका केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. 

यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी? या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का? भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? असा प्रश्नांचा भडीमार करत महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे असा घणाघात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. 

सध्या महाविकास आघाडीमध्ये खातेवाटपावरुन धुसफूस सुरु आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे असे ठरले आहे. पण आता काँग्रेसला १३ मंत्रिपदे हवी आहेत. नगरविकास, महसूल, वित्त यापैकी एक हवे. पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्षपद मिळत नसेल तर त्यांना नगरविकास, वित्त किंवा महसूल यापैकी एक खाते मिळावे, अशी अपेक्षा आहे. आपण मुख्यमंत्री होतो. त्यामुळे मंत्रिपदाबरोबर या तीनपैकी एक खाते मिळाले तर चांगले काम करता येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसश्रेष्ठींना सांगितल्याचे समजते. दोन दिवसांत शरद पवार आणि अहमद पटेल याबाबत निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस