मुंबई: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरु आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडी रात्री घडल्यामुळे स्थापन झालेलं सरकार देखील रात्रीच पडणार असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. तसेच अजित पवारांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने दोघांशिवाय एकमेकांना भेटायला कुणीच नसल्याने ते भेटत असल्याचा टोला देखील जयंत पाटील यांनी लगावला आहे.
अजित पवारांसोबत १०-११ आमदार शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे आमदार फुटल्याची चर्चा सांगण्यात आली. मात्र शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी संवाद साधला. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 54 पैकी 52 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा करण्यात आला आहे.
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने केलेला बहुमताचा दावा ग्राह्य धरून त्यांना मुख्यमंत्रीपदाची व अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रितपणे याचिका केली आहे. विषयाची निकड लक्षात घेऊन सरन्यायाधीशांनी खास स्थापन केलेल्या न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने रविवारची सुट्टी असूनही या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात आली. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे सत्तास्थापन करण्याचा निर्णय घेतला ते आज सकाळी 10.30 वाजता सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.