मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडीवर युवा स्वाभिमान पक्षाचे नेते आणि आमदार रवि राणा यांनी मोठं विधान केलंय. भाजपाचेच सरकार स्थापन होईल आणि जवळपास 170 आमदारांच्या पाठिंब्यावर हे सरकार बहुमत चाचणीत यशस्वी होईल, असा दावाही रवि राणा यांनी केलाय. रवि राणा यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय घडामोडींमध्ये ट्विस्ट पहायला मिळत आहे.
भाजपाला आपला पाठिंबा जाहीर करणारे आमदार रवि राणा यांनी खळबळजनक विधान केलंय. रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर, खासदार रवि राणा यांच्याप्रमाणेच राज्यात भाजपाचे स्थिर सरकार स्थापन होईल, असे म्हटले आहे. तसेच, सत्तास्थापनेला वेळ लागला असला तरी महाराष्ट्राला चांगले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपासोबत 175 पेक्षा अधिक आमदार आहेत. सध्या शिवसेनेतील घडामोडीमुळे ही संख्या आणखीन वाढेल, असा आशावादही राणा यांनी बोलून दाखवलाय. राणा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रविवारी दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच, महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही व्यक्त केलाय.