Maharashtra Government: विधानसभेच्या 286 आमदारांचा शपथविधी संपन्न; 'हे' 2 आमदार राहिले अनुपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:35 PM2019-11-27T13:35:40+5:302019-11-27T13:36:33+5:30
कालिदास कोळंबकर यांना मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे
मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्याला पूर्णविराम मिळाल्यानंतर 14 व्या विधानसभेचं कामकाज आजपासून सुरु झालं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्याचे आदेश दिल्यानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून सभागृह सुरु झालं.
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना दुपारी 1 वाजेपर्यंत सदस्यत्वाची शपथ दिली. कालिदास कोळंबकर यांना मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही.
14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ वंदे मातरम् ने तर राष्ट्रगीताने समारोप झाला. मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीचं लग्न येत्या 1 डिसेंबरला आहे त्यामुळे लग्नाच्या धावपळीत त्यांना आज मुंबईला येणं शक्य झालं नाही, तसेच देवेंद्र भूयार यांना विधान भवनात पोहचायला उशीर झाल्याने त्यांचा सभागृहात शपथ घेता आली नाही, त्यामुळे आता त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दालनात शपथ घ्यावी लागणार आहे.
सभागृहात आज अनेक नवनिर्वाचित आमदार जे पहिल्यांदाच सभागृहात आले होते. विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेक आमदारांचे स्वागत केले. राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीन पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात आलं आहे. मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे, गणेश नाईक, अशोक चव्हाण असा दिग्गज आमदारांसोबत पहिल्यांदाच सभागृहात आलेले आदित्य ठाकरे, रोहित पवार, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख अशा नवख्या आमदारांनीही शपथ घेतली.