मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षात अजित पवारांनी केलेल्या बंडाने अनेकांना धक्का बसला, भाजपासोबत हातमिळवणी करत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार फुटतील अशी चर्चा सुरु झाली. पण अवघ्या साडेतीन दिवसात अजित पवार राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले. त्यामुळे अजित पवारांना मंत्रिपद देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
अजित पवारांच्या बंडामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला नुकसान होणार अन् त्याचा फायदा भाजपाला मिळणार असं बोललं जातं होतं. पण या सर्व घडामोडीनंतरही शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवारांच्या मंत्रिपदाबाबत मोठे संकेत दिले आहेत. अजित पवार महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये महत्वाची भूमिका बजावतील. तुम्ही पाहिलं असेल किती मोठं काम करुन आलेत असं पत्रकारांना सांगताना अजित पवार पुन्हा परततील असं आम्ही पहिल्यापासून सांगत होतो असंही राऊत म्हणाले.
तसेच महाविकास आघाडीच्या मंगळवारच्या बैठकीनंतरही संजय राऊतांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. सगळंकाही ठरल्याप्रमाणेच झालं, अनेक गोष्टी ठरल्या होत्या त्या तशा पार पडल्या, या सर्व नाट्याचा दिग्दर्शक लवकरच कळेल असं सांगितल्यामुळे सत्तासंघर्षाचं हे नाट्य आधीच ठरलं होतं का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यामुळे भाजपाच्या नैतिकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले तसेच भाजपा नेत्यांच्या वेगवेगळ्या विधानामुळे घोडेबाजाराला ऊत आल्याचीही चर्चा झाली होती. मात्र अजित पवारांचा राजीनामा अन् भाजपाची झालेली नाचक्की हे सगळं काही ठरवून झालं होतं का? यावर चर्चा सुरु आहे.
दरम्यान, बुधवारी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी घेण्यात आला. यावेळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर खासदार सुप्रिया सुळे महाविकास आघाडीच्या आमदारांचे स्वागत करत होत्या. त्यावेळी अजित पवार विधानभवनात प्रवेश करताच अजित पवारांनी बहिण सुप्रिया सुळेची गळाभेट घेतली. त्यानंतर अनेक राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीलाही अजित पवारांनी उपस्थित लावली होती. त्यामुळे अजित पवार सक्रीय राजकारणातून सन्यास घेणार या चर्चेला सध्यातरी विराम मिळत आहे.