Join us

Maharashtra Government: अजित पवार पक्षासोबतच, राष्ट्रवादीच्या आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 11:47 AM

लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील हेसुद्धा अजित पवारांचे समर्थक आहेत.

मुंबईः शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सरकार स्थापन करणार असं जवळपास निश्चित मानलं जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपाच्या कंपूत सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले. यावेळी अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे आठ ते दहा आमदारही उपस्थित होते. त्यानंतर राजकीय उलथापालथी सुरू झाल्या. अजित पवारांसोबत गेलेले काही आमदार राष्ट्रवादीत परतले असून, पुन्हा एकदा त्या आमदारांनी शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील हेसुद्धा अजित पवारांचे समर्थक आहेत.अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटीलसुद्धा अजित पवारांसोबत गेले होते. परंतु ते आता स्वगृही परतले आहेत. त्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ जारी करत मी आणि अजित पवारसुद्धा राष्ट्रवादीबरोबरच असल्याचं सांगितलं आहे. मी लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधून राष्ट्रवादीचा आमदार आहे. महाराष्ट्र, लातूर जिल्हा आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही निवडणूक लढवली आहे. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढलो आहोत. अजितदादा आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवली आहे. आम्ही पवारसाहेबांचेच फॉलोवर आहोत. अजितदादासुद्धा राष्ट्रवादीबरोबर असून, ते आपल्याबरोबरच आहेत. आम्ही राष्ट्रवादीसोबतच राहणार आहोत. कार्यकर्ते आणि जनतेनं कुठल्याही अफवांना बळी पडू नये, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.  

दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाने निवडून आलेल्या सदस्यांची यादी तयार केली होती. या यादीवर आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. ही यादी बैठकीच्या वेळी तयार केली होती. मंडळाचे नेते म्हणून ही यादी त्यांच्याकडे होती. अंतर्गत कारणासाठी सह्या घेण्यात आल्या होत्या. त्या 54 जणांच्या पाठिंब्याची यादी म्हणून त्यांनी राज्यपालांना दाखवली की काय? आणि राज्यपालांची फसवणूक केली का असा प्रश्न आपल्यासमोर आहे, असेही शरद पवार म्हणाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या आमदारांना राष्ट्रपतीपुढे नेले जाणार आहे. आमच्याकडे बहुमत आहे हे लक्षात येताच राज्यातील फडणवीस सरकार राष्ट्रपतींना बरखास्त करावे लागेल. त्या दृष्टीनेही आमची चाचपणी सुरू आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना