मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, परंतु त्याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानं याचिकेवर सुनावणी करताना उद्या बहुमत सिद्ध करण्यास सांगितलेलं होतं, तत्पूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
अजितदादांच्या बंडामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत पवार कुटुंबात फूट पडत असल्याचं दिसून येत असल्याने शरद पवारांनी हालचाली सुरू केल्या होत्या. सोमवारी रात्री महाविकासआघाडीच्या 162 आमदारांचे शक्तिप्रदर्शन केल्यानंतर अजित पवारांशी संपर्क साधला गेल्याची माहिती समोर आली होती. अजित पवार राष्ट्रवादीच्या संपर्कात असून त्यांचे बंड शांत करण्यात यश येईल, असं सांगण्यात आलं होतं.